पवार, ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला विरोध केला- शिंदे-फडणवीसांचा आरोप
आमचा मार्ग मोकळा झाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गत डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी या मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर आज आपण दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. सुप्रीम कोर्टाने आपला मार्ग मोकळा केला तसा आम्ही समृद्धी मार्गाचा दुसरा टप्पा मोकळा केला. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही शब्दाला जागतो ते आमचे कर्तव्य आहे. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करीत नाही.
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, बंद खोलीत वाकडे तिकडे बोलायला ते मोकळे असतात. पण ते सर्व बाहेर आलेच. त्यावर मी बोलणार नाही. आमचे पुस्तक खुले आहेत. मेहनत, कष्टातून वेळेत प्रकल्प पूर्ण होतात. माझ्यावर समृद्धीची जबाबदारी दिली. लोकांना वाटत होते की, हे स्वप्नवत वाटत होते पण मला आणि फडणवीसांना खात्री होती. अनेक अडथळे आले. ते निर्माण केले गेले. विरोध केला, विरोध करायला लावला.
आमच्या पुतळ्याला फास लावले होते!
एकनाथ शिंदे म्हणाले, गावांगावांत गेलो. काही ठिकाणी आमचे पुतळे असे लावले की, त्याला फास लावलेले होते. देवेंद्र फडणवीसांनी तसेच सर्व अधिकाऱ्यांनी मेहनत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडथळे, गैरसोय दुर करून महामार्ग मोकळा केला. आपण आज पाचशे वीस किलोमिटरचा रस्ता करू शकलो तो पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळेच.
शेतकरी समृद्ध झाला
एकनाथ शिंदे म्हणाले, आधी शेतकरी जागा देत नव्हते पण शेतकरी नंतर तयार झाले. त्यांना फायदा दिसला. या प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध झाले. हा रस्ता शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा रस्ता आहे. यापुढचा तिसरा टप्पाही लवकरच तयार होईल.
स्वप्न पूर्ण झाले – देवेंद्र फडणवीस
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण महामार्ग सुरू करू. तिसरा टप्पा थेट मुंबईपर्यंत जाईल असा माझा विश्वास आहे. रस्ते विकास विभागाचे मंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते व मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी समृद्धी महामार्गाचे स्वप्न आम्ही बघितले. राज्याचा विकास करायचा असेल तर मागास भाग राजधानी मुंबईला जोडणे आवश्यक आहे.
मुझे रास्ता बनाने का शौक!
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रीन फिल्ड समृद्धी महामार्ग तयार करणे म्हणजे अनेक लोकांना स्वप्न वाटत होते. पण मला पूर्ण विश्वास होता तसा एकनाथ शिंदे यांनाही होता. मी आणि शिंदे लोकांना सांगत होतो की, मुझे रास्ते बनाने का शौक है…
न भुतो न भविष्यती..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आमदारांची बैठक घेतली. राज्याचे सर्व संपादक बोलावले व त्यांना मदतीची विनंती केली. विरोधाच्या काळात प्रकल्पाच्या बाजूने उभा राहीलात तर महाराष्ट्राचे कल्याण होईल असे म्हणून आम्ही त्यांची मदत घेतली. आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतले. जमीन भुसंपादनाचा नविन कायदा आपण संमत केला. त्यानंतर न भुतो न भविष्यती असा दर आम्ही दिला.
उद्धव ठाकरे, पवारांनी विरोध केला
फडणवीस म्हणाले, अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरला सभा घेत महामार्ग होऊ देणार नाही. एकही इंच जमीन देणार नाही हे सांगितले होते. शरद पवारांनीही हे शक्य नाही हे होऊ शकत नाही असे म्हटले होते. परंतु, त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लोकांच्या भेटी घेतल्या तेव्हा गावागावांतील लोकांनी जमीनी दिल्या. देशातील हे रेकाॅर्ड आहे की, सातशे एक किमीचा संपूर्ण ग्रीनफिल्ड मार्गाची जमीन नऊ महिन्यात संपादीत करून दाखवली.
विरोधक म्हणायचे शक्य नाही
फडणवीस म्हणाले, सर्व अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यातून आपण जमीन संपादीत करुन महामार्ग करू शकलो. पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्गघाटन केले तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार आम्हाला म्हणाले होते की, आम्हाला खरेच हे वाटले नव्हते विश्वास बसला नव्हता.आम्हाला साथ दिली त्यामुळे हा महामार्ग निर्माण झाले.
पंधरा जिल्ह्याचे भाग्य बदलणार
फडणवीस म्हणाले, पहिले नवनगर धोत्रा गावाचे करावे लागेल कारण ते पहिल्या दिवसांपासून सहकार्य करीत होते. तेथे लवकरच नवनगर तयार करण्याचे काम होणार आहे. हा महामार्ग म्हणजे आर्थिक दुवा असून तो पंधरा जिल्ह्याचे भाग्य बदलणारा आहे.
जीवन मुल्यावान, गती कमी ठेवा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाहनाची गती कमी ठेवा. जोपर्यंत वाहतूक व्यवस्थापन होत नाही. हा महामार्ग सरळ आहे त्यामुळे अनेकवेळा सरळ सरळ गेल्यामुळे डुलकी लागू शकते. महामार्ग वेगवान जरी असला तरी आपले जीवन मुल्यवान आहे. एकदा महामार्ग वाहतूक व्यवस्थापन केले की, अपघात कमी होतील हा मला विश्वास वाटतो. एका हायवेमुळे मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे. आम्ही फायलीवर बसणारे, अडवणारे लोक नाही तर काम करणारे लोक आहोत.
तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे.
7 मोठे पूल 30 भुयारी मार्ग
समृद्धी महामार्गावर 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा असून लांबी 80 कि मी आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 कि.मी पैकी आता एकूण 600 कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
महामार्गाचा हा आहे फायदा
या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.
- या टप्यात अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील एकूण 7 गावातून लांबी 11.141 कि.मी. नाशिक जिल्हयातील एकूण 68.036 कि.मी. लांबी पैकी सिन्नर तालुक्यातील एकूण 26 गावातून 60.969 कि.मी. व इगतपूरी तालुक्यातील 05 गावातील 7.067 कि.मी लांबीचा समावेश आहे.
- त्यामध्ये पॅकेज – 11अंतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज – 12 अंतर्गत गोदे ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज- 13अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.
- विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 20 22 रोजी केले होते.
- लोकार्पणानंतर हा महामार्ग खुला झाला, त्यामुळे नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे. पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे.