बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोट्यवधी देशवासियांच्या अपेक्षा वेटलिफ्टर मीराबाई चानूने पूर्ण केल्या आहेत. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ४९ ग्रॅम वजनी गटात विक्रम रचून देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. म्हणजेच मीराबाईने एकूण 201 किलो वजन उचलले. हा कॉमनवेल्थ स्पर्धेतील विक्रम होता. सुवर्णपदक जिंकल्यानंतर, ‘माझी स्पर्धा स्वतःशी होती. माझ्या कुटुंबाला आणि प्रशिक्षकांना हे पदक समर्पित करते’ अशा भावना मीराबाईने व्यक्त केल्या.
कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेचा दुसरा भारतासाठी उत्तम होता. महाराष्ट्रातील सांगलीच्या मराठमोळ्या संकेत सरगरने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. ५५ किलो वजनी गटात संकेत महादेव सरगरने रौप्य पदक जिंकलं. तर काही तासांत पुजारीने वेटलिफ्टिंगच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर वेळ होती ती मीराबाई चानूची… याअगोदरच्याही कॉमनवेल्थ स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक जिंकवून दिल्याने देशवासियांच्या मीराबाईकडून खूप अपेक्षा होत्या. मीराबाईने देखील आपल्या लौकिलाला साजेशी कामगिरी करुन देशवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या. भारताने आज दिवसभरात तीन पदकं जिंकली आहेत.
मीराबाईची सुवर्ण कामगिरी
मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात १०९ किलो वजन उचलले. त्याचवेळी दुसऱ्या प्रयत्नातही तिने 113 किलो वजन उचलण्यात यश मिळवले. स्नॅचच्या तिसऱ्या प्रयत्नात मीराबाई चानूला ९० किलो वजन उचलता आले नाही. म्हणजेच, स्नॅचमध्ये मीराबाईचा सर्वोत्तम प्रयत्न 88 किलो होता, जो एक गेम रेकॉर्ड आहे. चानूनंतर मेरी हनित्रा रॉयला स्नॅचमध्ये दुसरी आली. मेरीने ७६ किलोचा भार यशस्वीपणे उचलला.
याअगोदर मीराबाई चानूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मीराबाईने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. आता मीराबाई चानूने बर्मिंगहॅम गेम्समध्ये चमकदार कामगिरी करून वेटलिफ्टिंगला नवी दिशा दाखवली आहे.