(मुकुंद रांजाणे) May 14, 2023 09:22 PM
माथेरान :काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असताना माथेरान या पर्यटनस्थळावर अद्यापही आपत्कालीन व्यवस्थे बाबतीत नियोजन करण्यात आलेले नसल्याने नगरपरिषदेच्या या भोंगळ कारभारा बाबत भूमिपुत्रांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान हे स्थळ १२०० एकरांच्या परिसरात एकूण ५२ किलोमीटर मध्ये वसलेले घनदाट जंगलव्याप्त थंड हवेचे ठिकाण असून येथे पावसाचे प्रमाण सरासरी 250 ते 300 इंच इतके असते संपूर्ण उताराचा भाग असल्यामुळे याठिकाणी पाणी साठून रहात नाही.परंतु एमएमआरडीए ने बांधलेली गटारे अत्यंत निमुळती असून त्यातून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही हे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहते.त्यामुळे क्ले पेव्हर रस्त्याची दुर्दशा होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी पावसाळ्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्त्याला बांध घातले जातात त्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही कारण येथील नगरपालिका कार्यालयात मुख्यअधिकारी कार्यरत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा पुरता बोजवारा उडाला आहे.
माथेरान हा डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मातीची धूप होत असून परिणामी अतिवृष्टीत झाडे उन्मळून पडतात.इथल्या वनराईचे रक्षण करण्यासाठी नगरपरिषदेच्या सोबतच वनखात्याची सुध्दा तितकीच जबाबदारी असते परंतु दरवर्षी पावसाळ्यात वनखाते केवळ वृक्षारोपण करण्याची प्रक्रिया, दिखावा करून समिती अंतर्गत स्वतःच कामे घेऊन लाखो रुपयांचा चुराडा करत असते.वनसंवर्धन करण्यासाठी या खात्याकडे आणि वन समितीच्या पदाधिकाऱ्यांना वेळ नसतो त्यामुळे इथली वनराई दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे.अनेक ठिकाणी धोकादायक जागा झालेल्या आहेत त्या नागरिकांना संरक्षण देण्यासाठी निदान पावसाळ्यापूर्वी ज्या काही आपत्कालीन प्रक्रिया आहेत त्या युद्धपातळीवर पूर्ण कराव्यात असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
—————————— —————————
काही महत्वाच्या भागातील गटारे बंद झाली असल्याकारणाने त्या त्या ठिकाणी मोठे चर पडले आहेत त्यामुळे पावसाळ्यात मातीची प्रचंड प्रमाणात धूप होते.पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना नगरपरिषदेच्या त्याचप्रमाणे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी अंमलात आणली पाहिजे.पावसाळी कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.
चंद्रकांत सुतार–सामाजिक कार्यकर्ते माथेरान