मुंबई/एन एच आय/प्रतिनिधी
अमीर बिल्डींग हितचिंतक नवरात्रौत्सव मंडळ-डोंगरी आयोजित क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषक लीगच्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेची सलामी लढत झुबेर सय्यदचा समीर स्मॅशर्स विरुध्द जुगनू सिंहचा सिंह पॅकर्स डोंगरी यामध्ये १३ मे रोजी सकाळी ८.०० वा. छत्रपती वीर संभाजी मैदानात रंगणार आहे. सलामीची लढत जिंकणारा संघ साखळी अ गटात प्रथम स्थानाची दावेदारी करण्यासाठी सज्ज असेल. स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेटप्रेमी दीपक सुर्वे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, अनंत सुर्वे, पार्थ सुर्वे, सिध्देश सुर्वे, साईश सुर्वे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
साखळी ब गटात महेंद्र पटेलचा दीक्षिता इलेव्हन विरुध्द मुबीन मुल्लाचा एम.एम. मोटर्स यामधील पहिली साखळी लढत देखील चुरशीची होईल. त्यानंतर स्मित सुळेभाविकरचा रुद्र रेनेगडेज विरुध्द नासीर पटनीचा डोंगरी वॉरीयर्स, शाहनवाझ खानचा शानू स्ट्रायकर्स विरुध्द एम.एम मोटर्स आणि अ गटातील मधुसूदन अमरेचा एम.एम. अमरेज विरुद्ध वीरेंद्र पाटीलचा व्ही.पी. वॉरीयर्स, केदार आंबरेचा के.एस.ए. स्पोर्ट्स विरुध्द सिंग पकर्स डोंगरी आदी लढती होतील. बाद फेरीच्या सामान्यांना रविवारी सकाळपासून प्रारंभ होणार असून अंतिम फेरीची लढत दुपारी ३.०० वा. होईल.
स्पर्धेमध्ये विजेत्या-उपविजेत्यांना वैयक्तिकसह भरघोस पुरस्कार दिले जाणार असून अंतिम विजेत्यास क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषकासह रु.८८,८८८/- पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उत्तम खेळपट्टी होण्यासाठी क्रिकेटपटू राजेश सुर्वे, विलास मटाले, अविनाश दुधाणे, चंद्रकांत करंगुटकर, वीरेंद्र पाटील, नरेश तोडणकर, प्रशांत म्हात्रे, किरण खडपे, अमित कांबळी, भूषण राऊत, अनुज कांबळे, आशिष चिंदरकर, विनय भगत, मनोज मानकर, जुगनू सिंह, राहुल थळे, राजेश मांजरेकर, शाहबाज शेख, मोहन अत्रे आदी विशेष कार्यरत आहेत. परिणामी मुंबईतील क्रिकेट शौकिनांना दोन दिवस दर्जेदार खेळाची मेजवानी मिळणार आहे.
******************************