मुंबई/एन एच आय/प्रतिनिधी
वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित २६ व्या अजित नाईक स्मृती १४ वर्षाखालील दोन दिवशीय एमसीए क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या साखळी सामन्यात गोरेगाव केंद्र, कल्याण केंद्राने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय प्राप्त केला. गोरेगाव केंद्राने पहिल्या डावात युग असोपा (१०५ चेंडूत ७१ धावा) व राम शांडिल्य (६३ चेंडूत ३६ धावा) यांच्या प्रमुख फलंदाजीमुळे सर्वबाद २६७ धावा फटकाविल्या. अर्णव अध्यापक (५४ धावांत ५ बळी) व यश साळसकर (६५ धावांत ४ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. प्रत्युत्तर देतांना सामनावीर युग असोपा (३७ धावांत ४ बळी) व दीप कनोजिया (३४ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे कांदिवली केंद्राला १५२ धावांपर्यंतच मजल गाठता आली.
दुसऱ्या सामन्यात २९ धावांची आघाडी पहिल्या डावात घेणाऱ्या कल्याण केंद्राच्या ८ बाद ९२ धावांच्या अवस्थेनंतर नवव्या जोडीने दुसऱ्या डावात शतकी भागीदारी करून अंबरनाथ केंद्राच्या निर्विवाद विजयाला हुलकावणी दिली. अर्धशतकवीर अमोघ पाटील (८७ चेंडूत नाबाद ५९ धावा) व सुयोग बासरे (८३ चेंडूत ५५ धावा) यांनी नवव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून शेवटच्या दिवस अखेर कल्याण केंद्राला ९ बाद २०७ धावांसह सामन्यामध्ये अनिर्णीत अवस्था राखून दिली. परिणामी कल्याण केंद्राने पहिल्या डावातील (सर्वबाद १९३ धावा) २९ धावांच्या आघाडी बळावर विजय प्राप्त केला.
********************************************