पुणे : पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे सुप्रसिद्ध ग्रामीण कथा कादंबरीकार द. स.काकडे यांचे लेखन ग्रामीण जीवनावर आधारित असून, ग्रामीण भागातील तत्कालीन जीवन त्यांच्या कादंबरीत असते. असे स्पष्ट उद्गार मराठी बाणा फेम व शिवनेरी भूषणकार अशोक हांडे यांनी काढले.
शब्दरत्न प्रकाशनच्या वतीने द. स. काकडे यांच्या ” कुकडीचे पाणी ” या आत्मचरित्राचे व दीप लक्ष्मी तांबे लिखित ” मी आणि माझ्या कविता ” या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा १० मे. २०२३ रोजी प्रभादेवी येथील पू. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात ज्येष्ठ अभिनेते अशोक हांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ व्याख्याते, साहित्यिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धनंजय वंजारी यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, १९७० ते २०२३ पर्यंत द.स. काकडे यांची २०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र काकडे हे प्रकाशन सोहळ्याच्या प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहिले. प्रथमच त्यांच्या कुकडीचे पाणी या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा होत आहे. कुकडीचे पाणी या आत्मचरित्रातून आत्मदर्शन देणारे पुस्तक निर्माण झाले आहे. प्रत्येक माणसांमध्ये पुस्तक असते माणसातले पुस्तक वाचायला आपण शिकले पाहिजे. काकडे सारखे आपण दीपस्तंभ सारखे झाले पाहिजे. शेवटी अनुभव हा समृद्ध आहे. जीवन आपल्याला जे देते, ते आपणास पुन्हा द्यावे लागते. मी पोलीस अधिकारी असून, आतापर्यंत सहा पुस्तके लिहिली आहेत. त्याचा मला निश्चितच अभिमान वाटतो. स्तंभलेखक संजय नलावडे यांनी द. स. काकडे यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले. शेवटी त्यांनी आपल्या शुभेच्छा देताना सांगितले की, घरातील साथ असल्याशिवाय माणूस पुढे जात नाही जीवनात मोठे व्हायचे असेल तर, पुरुषाला स्रीची व स्त्रीला पुरुषाची साथ असलीच पाहिजे. समाज सेविका व माजी नगरसेविका सुनिता शिंदे यांनी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. लेखक द.स. काकडे, कवियत्री दीपलक्ष्मी तांबे आणि कवियत्री पूर्णिमा तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बालकलाकार समय तांबे यांनी काकडे यांच्या भूमिकेत जाऊन सुंदर प्रास्ताविक भाषण केले. तरुण कलाकार उदित पाटील यांनी कुकडीचे पाणी या आत्मचरित्राचे संक्षिप्त वाचन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सौरभ सोहनी यांनी केले तर आभार कांचन पवार यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत सतीश काकडे यांनी केले. व्यासपीठावर साहित्यिक शिवाजी चाळक, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतराव जाधव, शब्दरत्न प्रकाशनाच्या प्रकाशिका व द. स. काकडे यांच्या सुविद्य पत्नी शारदा काकडे उपस्थित होते.