MUMBAI : सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याआधीच राजीनामा देतील, असा दावा काही कायदेतज्ज्ञांकडून आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील, असं म्हणणं हा मुर्खांचा बाजार आहे. मी यावर जास्त बोलू शकणार नाही, पण एकनाथ शिंदे राजीनामा का देतील? त्यांनी काय चूक केली आहे? असा सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला. ते लातूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “आम्ही आशादायी आहोत. कारण आमची बाजू मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आमची अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्यावर तर्क वितर्क लावणं, योग्य नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत.”
‘निकालापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील’ असं घटनातज्ज्ञ किंवा विरोधक बोलत आहेत, याबाबत विचारलं देवेंद्र फडणवीस म्हणाले,”मला माफ करा, पण मी हा शब्द वापरत आहे, हा सगळा मुर्खांचा बाजार आहे, यापेक्षा जास्त मी बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे राजीनामा कशासाठी देतील? काय कारण आहे? त्यांनी काय चूक केली आहे? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होईल.”