मुंबई/प्रतिनिधी/NHI : निर्णायक पाचव्या फेरीत आघाडीवरील अरेना कॅन्डीडेट मास्टर-एसीएम रुद्र कंदपालला शह देत अरेना फिडे मास्टर-एएफएम हृदय मणियारने पार्क क्लब व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १२ वर्षाखालील वयोगटाची महाराष्ट्र दिन बुध्दिबळ स्पर्धा जिंकली. १२ वर्षाखालील मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित जियाना धरमश्रीने, १४ वर्षाखालील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित कर्णाव रस्तोगीने आणि मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित साची कुळकर्णीने विजेतेपद पटकाविले. विजेत्या-उपविजेत्यांना पार्क क्लबच्या चेअरपर्सन वरदा चुरी, पी.व्ही. देसाई, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांनी गौरविले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला विभाग प्रमुख गौरी चव्हाण यांनी केले.
आंतरराष्ट्रीय गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूच्या दर्जेदार खेळामुळे महाराष्ट्र दिन शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये निर्णायक साखळी फेरीपर्यंत लढती चुरशीच्या झाल्या. दोन्ही वयोगटामधील गुणानुक्रमे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे ठरले. १२ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये हृदय मणियारने (४.५ गुण) प्रथम, मानस हाथीने (४.५ गुण) द्वितीय, रुद्र कंदपालने (४ गुण) तृतीय, आदित्य झाने (४ गुण) चौथा, अथर्व कोरान्नेने (३.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये जियाना धरमश्रीने (३ गुण) प्रथम, मर्गज प्रिशाने (२.५ गुण) द्वितीय, आर्या नाईकने (१ गुण) तृतीय, अहाना राईकरने (१ गुण) चौथा क्रमांक पटकाविला. १४ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये कर्णाव रस्तोगीने (५ गुण) प्रथम, अद्वय मुणगेकरने (४ गुण) द्वितीय, कुशाग्र खंडेलवालने (३.५ गुण) तृतीय, मोहमद तौशिबने (३.५ गुण) चतुर्थ, चैत्रांग पडवळने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये साची कुळकर्णीने (३.५ गुण) प्रथम, वैष्णवी अय्यरने (३ गुण) द्वितीय, दृश्या नाईकने (३ गुण) तृतीय, फलाक्षी लाब्रेने (३ गुण) चौथा, अनया जैनने (२.५ गुण ) पाचवा क्रमांक मिळविला.
***************