मुबंई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
संजय राऊत, भगतसिंह कोश्यारी व एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. “५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत”, असं म्हणत राऊतांनी हल्ला चढवला. संजय राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट करत चार ट्वीट करत टीका केली.
“भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू” : खा. संजय राऊत
संजय राऊत आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. ऐका, ऐका.”