MUMBAI/NHI
डॉ.एच.डी. कांगा बाद पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धेत आदर्श क्रिकेट क्लबने गॅलंट क्रिकेट क्लबचा ६ विकेटने पराभव करून सलामीची लढत जिंकली. सलामीवीर यश सोमिएस्कर व अभिषेक पालव यांची अर्धशतके आदर्श क्रिकेट क्लबला विजयासाठी उपयुक्त ठरली. मधल्या फळीतील विकास भोसले व मंदार नलावडे यांनी पराभूत संघातर्फे उत्तम फलंदाजी केली. स्पर्धेचे शानदार उदघाटन एमसीएचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक, जॉईन्ट सेक्रेटरी दीपक पाटील, बॉम्बे जिमखान्याचे राहुल सागर, अपेक्स कौन्सिल मेम्बर्स आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
नवरोज-आझाद मैदानावर आदर्श क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून गॅलंट क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. फिरकी गोलंदाज ध्रुव गोठी (१७ धावांत ४ बळी) व मध्यमगती गोलंदाज प्रसाद ताम्हणकर (२३ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे गॅलंट क्लबचा निम्मा संघ अवघ्या ३४ धावसंख्येवर तंबूत परतला. तरीही निराश न होता विकास भोसले (३१ धावा) व मंदार नलावडे (३१ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे गॅलंट क्लबला सर्वबाद १३२ धावांचा पल्ला गाठता आला. सलामीवीर यश सोमिएस्कर (५८ धावा) व अभिषेक पालव (नाबाद ५१ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे आदर्श क्रिकेट क्लबने २४.२ षटकात विजयी ४ बाद १३३ धावा फटकावून प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान संपुष्टात आणले.