ही घटना बंगळुरूतील येलहंकात 21 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. यात ही महिला बाइकवरून उडी मारताना दिसते. उडी मारल्यानंतर ती रस्त्यावर थोडे अंतर फरफटत जाताना दिसते. त्यानंतर उठून ती दुसऱ्या दुचाकी चालकाला मदतीसाठी थांबवते. तेवढ्यात काही लोक तिच्या मदतीसाठी तिथे थांबतात. तर सदरील रॅपिडो चालक लोक गोळा झाल्याचे पाऊन तिथून पळून जातो. दुचाकीवरून उडी मारल्याने ही महिला जखमी झाली आहे.
एफआयआर दाखल
पीडित महिलेच्या एफआयआरनुसार ती एका खासगी संस्थेत काम करते. तिचे वय 30 वर्षे आहे. महिलेने 21 एप्रिल रोजी येलहंकातून घरी जाण्यासाठी रात्री 11 वाजता रॅपिडो बूक केली होती. त्यानंतर रॅपिडो चालक आल्यावर ओटीपी टाकण्यासाठी त्याने महिलेचा फोन तिच्या हातातून घेतला. त्यानंतर महिलेला पिक करत त्याने त्याच भागात एक चक्कर मारल्याचेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.