NHI/MUMBAI : पार्क क्लब व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने महाराष्ट्र दिनी-१ मे रोजी सकाळी ९.०० वा. शालेय मुलामुलींसाठी जलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. केळुस्कर रोड-शिवाजी पार्क येथील पार्क क्लब वातानुकुलीन सभागृहात ही स्पर्धा ८/१०/१२/१४ वर्षाखालील चार वयोगटात होणार आहे. स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ६० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती संघटन समितीचे अध्यक्ष पी. व्ही. देसाई व कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.
स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा किमान चार साखळी फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक वयोगटातील मुलामुलींचा एक गट अशा विविध चार वयोगटात स्पर्धा होईल. प्रत्येक वयोगटामध्ये पहिल्या १० क्रमांकाच्या मुलांसाठी तर पहिल्या ५ क्रमांकाच्या मुलींसाठी आकर्षक चषकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक साखळी सामना १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंट वेळेचा पहिल्या चालीपासून राहील. सर्व खेळाडूंसाठी घड्याळे व बुध्दिबळ पटाची व्यवस्था संयोजकांद्वारे होईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुद्दीबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २८ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा.