NHI
MUMBAI : भामा क्रिकेट क्लबतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने सुरु झालेल्या दुसऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत नवरोज क्रिकेट क्लब, सुपरस्टार स्पोर्ट्स क्लबनी साखळी सामने जिंकले. नवरोज क्रिकेट क्लबने यजमान भामा क्रिकेट क्लबचा १३५ धावांनी पराभव करतांना विजयी संघाचे आयुष अगरवाल (५६ धावा), निहार मगरे (नाबाद ४९ धावा), रुद्र दाते (१८ धावांत ४ बळी), अथर्व सावंत (९ धावांत ३ बळी) आदी चमकले. नवरोज क्रिकेट क्लबचे २१६ धावांचे आव्हान गाठण्यापूर्वीच भामा क्रिकेट क्लबचा डाव ८१ धावसंख्येवर कोसळला. भामा क्लबतर्फे कनक डेव्हीन (३१ धावा), लकी सिंग (३२ धावांत ५ बळी), चिन्मय केळकर (२७ धावांत ३ बळी) यांनी छान खेळ केला.
दुसऱ्या साखळी सामन्यात मंगरोल क्रिकेट क्लब-ओम्नी ग्लोबल संघाविरुध्द नाणेफेक जिंकून सुपरस्टार स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी केली. अगस्थ्या (३९ धावा), हर्षवर्धन (३७ धावा) व क्रिश सिंग (३२ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे सुपरस्टार क्लबने ७ बाद २७७ धावा फटकाविल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मंगरोल क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना सुपरस्टार क्लबच्या गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. प्रल्हाद (१६ धावांत ५ बळी), अष्टपैलू अगस्थ्या (२८ धावांत ३ बळी) व कार्तिकेय (१२ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मंगरोल क्रिकेट क्लबचा डाव २६ व्या षटकाला ९२ धावांवर गारद झाला. परिणामी सुपरस्टार क्रिकेट क्लबने १८५ धावांनी शानदार विजय मिळविला.