‘भाडिपा’ प्रस्तुत ‘चिकटगुंडे’चा पहिला सिझन एका अशा वळणावर येऊन थांबला जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती ती सिझन २ ची आणि अखेर ‘चिकटगुंडे २’ मागील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘चिकटगुंडे २’च्या पहिल्या भागात कार्तिक (सारंग साठे) आणि आभा (श्रुती मराठे) यांच्यात फॅमिली प्लॅनिंग आणि प्रेग्नंसीवर चर्चा सुरू होती. या दरम्यान त्यांची लुटुपुटुची भांडणं, त्यांच्यातलं खट्याळ, खोडकर प्रेम पाहायला मिळाले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच २१ एप्रिल रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘चिकटगुंडे २’चा दुसरा एपिसोड प्रदर्शित होत असून यात सुहास (सुहास शिरसाठ) आणि गायत्री (स्नेहा माझगांवकर) दिसणार आहेत. एखाद्या कपलचे ‘ते’ खासगी क्षण जगासमोर आल्यावर सगळे जण त्याला एन्जॅाय करतात परंतु त्या कपलवर त्याचा काय परिणाम होतो, हे दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात आलेला दुरावा कमी होणार का आणखीन काही अडचणी त्यांचा दरवाजा ठोठवणार, हे या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्या आयपीएल फिव्हर असल्यामुळे ‘चिकटगुंडे २’च्या टीमने प्रमोशनच्या निमित्ताने आयपीएललाही भेट दिली . यावेळी क्रिकेटच्या गप्पांसोबतच ‘चिकटगुंडे २’च्याही गप्पा रंगल्या.
प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत, गौरव पत्की दिग्दर्शित ‘चिकटगुंडे २’ या दुसऱ्या सीझनमध्येही सारंग साठे, श्रुती मराठे, सुहास शिरसाठ, स्नेहा माझगांवकर, सुशांत घाडगे, चैतन्य शर्मा, पुष्कराज चिरपुटकर आणि स्वानंदी टिकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” पहिल्या सिझनला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा सिझन आला आहे. दुसऱ्याच सिझनच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. गेल्या भागात लॅाकडाऊनमध्ये अडकलेले कपल्सची कहाणी आता पुढे गेली आहे. आता त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतील, त्या दर शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येतील.’’