मुंबई, : दिलीप वेंगसरकर यांचे क्रिकेटमधील योगदान हे सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही कितीतरी मोठे असल्याचे मत भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू करसन घावरी यांनी व्यक्त केले. ओव्हल मैदान, चर्चगेट येथे ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर वेंगसरकर यांनी ज्या पद्धतीने तीन-तीन अकादमी निर्माण करून छोट्या खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून उदयोन्मुख खेळाडूंच्या गुणवत्तेला खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत ते नक्कीच अनुकरणीय आहे.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत एम.आय. जी. संघाने गणेश पालकर क्रिकेट क्लब संघावर केवळ सात धावांनी सनसनाटी विजय मिळवत ड्रीम ११ कप वर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाची छाप पाडणारा वेदांग मिश्रा हा एम.आय. जी.च्या विजयाचा शिल्पकार ठरला.
एम.आय. जी. संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद १४४ धावांची मजल मारली. सलामीवीर अगस्त्य काशीकर (नाबाद ५९) आणि वेदांग मिश्रा (४७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची दमदार भागीदारी रचली तर त्यानंतर अगस्त्याने प्रेरित राऊत (नाबाद २८) याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची अभेद्य भागीदारी रचून आपल्या संघाला २ बाद १४४ धावांचे लक्ष्य उभारण्यास मदत केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना सन्मित कोठमीरे (३५) आणि डावखुरा सिद्धांत सिंग (४५) यांनी झुंजार प्रयत्न केले. मात्र अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांचे प्रयत्न ७ धावांनी अपुरे पडले. २० षटकांत त्यांना ९ बाद १३७ धावांचीच मजल मारता आली. राजवीर लाड याने २४ धावांत ३ बळी मिळवत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. वेदांग मिश्रा याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पारितोषिकासह स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांसह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी कसोटीवीर करसन घावरी, नाईक फिशरीसचे निस्सार नाईक, दीपक जाधव आणि ड्रीम ११ चे प्रशांत तायडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – एम.आय.जी. २० षटकांत २ बाद १४४ (अगस्त्य काशीकर नाबाद ५९, वेदांग मिश्रा ४७, प्रेरित राऊत नाबाद २८) वि.वि. गणेश पालकर क्रिकेट क्लब – २० षटकांत ९ बाद १३७ (सन्मित कोठमीरे ३५, सिद्धांत सिंग ४५; राजवीर लाड २४ धावांत ३ बळी ).