मुंबई, : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या वतीने माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांच्या स्मरणार्थ पहिल्या १५ वर्षाखालील मुलांच्या राजसिंग डुंगरपूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २४ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत सी.सी.आय. (ब्रेबॉर्न स्टेडियम) येथे ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. यजमान सी.सी.आय. संघासह मुंबईतील अन्य सात अकादमीचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार असून प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. गटातील अव्वल संघाना अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळणार असून २८ एप्रिल रोजी अंतिम फेरीची लढत खेळविण्यात येईल.
ब्रेबॉर्न स्टेडियमचा एकूण आकार पाहता एकाच वेळी दोन सामने खेळविण्यात येणार असून सकाळच्या सत्रात दोन आणि दुपारच्या सत्रात दोन असे सामने खेळविण्यात येणार आहेत अशी माहिती सी.सी.आय.चे राजू परुळकर यांनी दिली. राजसिंग डुंगरपूर यांचे क्रिकेट प्रेम सर्वानाच माहिती आहे आणि त्यांची जुनिअर क्रिकेटप्रती असलेली ओढ़ लक्षात घेऊनच सी.सी.आय. ने १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून सुरुवात केली असून यापुढे प्रतिवर्षी आणखीन भव्य -दिव्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस परुळकर यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी जगातील सर्वोत्तम स्टेडियम पैकी एक असणाऱ्या ब्रेबॉर्न स्टेडियम वर खेळण्याचा आनंद वेगळाच असून मी प्रथम आंतर शालेय क्रिकेट सामना याच मैदानावर खेळल्याची आठवण त्यांनी सांगितली आणि राजभाई यांची त्यावेळी पहिली ओळख झाल्याचे सांगितले. राजभाई यांनी भारतीय क्रिकेट संघटनेत विविध पदांवर काम करताना नेहमीच सर्व खेळाडूंसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले. यावेळी वेंगसरकर यांच्यासह माजी कसोटीपटू करसन घावरी, राजू कुलकर्णी, सुरु नायक आणि सी.सी.आय.चे उपाध्यक्ष डी. मेहता देखील उपस्थित होते. यावेळी या स्पर्धेच्या निमित्ताने सी.सी.आय.च्या कॅप्स, टी.शर्ट आणि ट्रॉफीचे वेंगसरकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
सदर स्पर्धेत सी.सी.आय. क्रिकेट अकादमी, साळगावकर स्पोर्ट्स क्लुब, मुंबई क्रिकेट क्लब, अविनाश साळवी फौंडेशन, ड्रीम ११ दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, संजीवनी क्रिकेट अकादमी, अवर्स क्रिकेट अकादमी, एजिस फेडरल दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी अशा आठ संघांचा सहभाग आहे.