Mumbai/NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित नुकत्याच झालेल्या क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार खेळ करूनही कप्तान रोहन ख्रिस्तियन, अष्टपैलू महेश सणगर, अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंडे, अष्टपैलू अंकुश जाधव, रोहन जाधव, कल्पेश भोसले, मंगेश आगे, दीपक नाखवा आदींच्या कस्तुरबा हॉस्पिटल क्रिकेट संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाच्या मोसमात दोनदा अंतिम फेरी गाठूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. उपविजेतेपदाचा चषक राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, डॉ. राजेश मयेकर, क्रिकेटपटू राजेश सुर्वे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक अनिकेत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या हस्ते स्विकारताना पुढील स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.
साखळी व बाद सामन्यात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या कस्तुरबा हॉस्पिटलच्या फलंदाजांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुध्द निर्णायक सामन्यात साकारता आली नाही. तरी देखील मर्यादित २० षटकात ११० धावांचे कस्तुरबा हॉस्पिटलचे आव्हान प्रतिस्पर्धी बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला सुरुवातीला कठीण झाले होते. भरवंशाच्या आघाडी फलंदाजांना लवकर तंबूत धाडण्याची किमया कस्तुरबा हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी केली. त्यावेळी डावाच्या मध्यापर्यंत कस्तुरबा हॉस्पिटलचे पारडे विजयासाठी भारी वाटत असतांना निर्णायक क्षणी त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत ग्लोबल हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचे १३८ धावांचे लक्ष्य अकराव्या षटकाला १ बाद ७२ धावा उभारून साध्य करण्याचा छान प्रयत्न केला. परंतु कस्तुरबा हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी त्यांना मर्यादित २० षटकात १३२ धावसंख्येवर थोपविले आणि कस्तुरबा हॉस्पिटलने चुरशीचा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली होती. साखळी सामन्यात सहज विजय मिळविण्यासाठी अष्टपैलू खेळ करणारा अंकुश जाधव मात्र उपांत्य सामन्यापासून अनफिट ठरल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटल संघाला त्याची उणीव प्रकर्षाने भासली. अष्टपैलू महेश सणगरने स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकावून क्रिकेट शौकिनांची शाबासकी मिळविली.
******************************