NHI/ प्रतिनिधी
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटल विरुध्द ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये चुरस होईल. अंतिम सामना १८ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वा. शिवाजी पार्कात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, डॉ. राजेश मयेकर, क्रिकेटपटू राजेश सुर्वे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक अनिकेत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. समारोप प्रसंगी रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
जखमी अष्टपैलू अंकुश जाधवच्या गैरहजेरीत उपांत्य फेरीमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलने अष्टपैलू महेश सणगर, डॉ. परमेश्वर मुंडे, कल्पेश भोसले, मंगेश आगे यांच्या दमदार खेळामुळे बलाढ्य ग्लोबल हॉस्पिटलविरुध्द निसटता विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. कस्तुरबा हॉस्पिटलचे सर्व खेळाडू निर्णायक क्षणी उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे त्यांचे होसले अजिंक्यपदाचा ज्येष्ठ समाजसेवक दिलीप करंगुटकर स्मृती चषक पटकाविण्यासाठी बुलंद झाले आहेत. तरीही प्रतिस्पर्धी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने यंदाच्या मोसमात दर्जेदार कामगिरी करतांना रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेच्या दोन स्पर्धा इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. त्यामुळे कप्तान प्रदीप क्षीरसागरसह जय तामोरे, मुत्तू इसाकी, रोहन महाडिक, सुनील बांदवलकर, सुधाकरन अब्राहम, अरुण पारचा आदीं खेळाडूंचा समतोल ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा चमू यंदाच्या मोसमातील अजिंक्यपदाची हॅटट्रीक नोंदविण्यासाठी आतुर आहे. परिणामी अटीतटीची रंगतदार लढत माहीम ज्युवेनैलच्या खेळपट्टीवर क्रिकेट शौकिनांना पाहण्यास मिळणार आहे. तृतीय क्रमांकासाठी कप्तान डॉ. हर्षद जाधव, अष्टपैलू सुशांत गुरव, डॉ. मनोज यादव, भावेश डोके, डॉ. अब्राहम शेख आदींचा सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द कप्तान महेश गोविलकर, अष्टपैलू कपिल गमरे, सलामीवीर दयानंद पाटील, आशिष जाधव, निलेश देशमुख, सुनील सकपाळ आदींचा ग्लोबल हॉस्पिटल यामध्ये तृतीय क्रमांकासाठी सामना होणार आहे.