मुंबई : पूर्व उपनगरातील गोवंडी शिवाजी नगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन राजवाडी रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
शकील जलील खान (३४), रजिया शकील खान (२५), सरफराज शकील खान (७) आणि अतिसा शकील खान (३) अशी आत्महत्या करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. शकील आणि रजिया हे पती पत्नी असून सरफराज आणि अतिसा ही त्यांची मुले आहेत. गोवंडी शिवाजी नगर येथील रोड क्रमांक १४, पद्मा नगर याठिकाणी हे कुटुंब राहत होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शकील खान यांच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला, त्यांनी शिवाजी नगर पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता शकील खान यांच्या घराची कडी आतून बंद होती, पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडून आत प्रवेश केला असता पती पत्नी आणि दोन मुले निपचित अवस्थेत आढळली.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; अपमृत्यूची नोंद
पोलिसांनी तात्काळ चौघांना शताब्दी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी चौघांना तपासून मृत घोषित केले. या चौघांचा मृत्यू विषारी द्रव्य घेतल्यामुळे झाला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी कुठलीही संशयास्पद तसेच सुसाईड नोट सापडली नाही त्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.