अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची येत्या 16 एप्रिल रोजी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले, अजित भुरे ,दिलीप जाधव, विजय केंकरे, सविता मालपेकर ,सयाजी शिंदे, सुशांत शेलार ,विजय गोखले, वैजयंती आपटे ,विजय सूर्यवंशी आदी नाट्यनिर्माते व रंगकर्मी मिळून “रंगकर्मी नाटक समूह पॅनल” या बॅनरखाली निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पॅनलचे उमेदवार व अष्टविनायक नाट् संस्थेचे प्रमुख दिलीप जाधव यांच्याशी साधलेला हा संवाद…
“अष्टविनायक” या नाट्य संस्थेने आतापर्यंत एवढी गाजलेली नाटकं रंगभूमीवर आणली आहेत आता यापुढे तुमचं नवीन नाटकाचं प्लॅन्स काय आहेत ?
यावर बोलताना दिलीप जाधव म्हणाले,एक दोन प्लॅन माझ्यासमोर आहेत पण माझ्या हातात अजून त्याचे स्क्रिप्ट आलेले नाहीत. अशोक मामांसाठी एक नाटक करायचं डोक्यात आहे तसेच” जाऊ बाई जोरात” पार्ट टू पण करायचं आहे. पुरुषोत्तम बेर्डे सध्या एका दुसऱ्या नाटकाच्या तालमीत असल्याने त्यांनी लिहिलेल्या “जाऊ बाई जोरात” पार्ट टू यावर अद्याप वाचन झालेले नाही त्यामुळे पढील निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र ही दोन नाटके लवकरात लवकर रंगभूमीवर कशी येतील या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना नंतर नाट्यव्यवसाय आता सुरळीत झाला आहे असं तुम्हाला वाटतं का ?
कोरोना काळानंतर नाट्यसृष्टी आता बऱ्याच अंशी रुळावर आली आहे.३१ मार्च २०२३ पर्यंत मुंबई महापालिकेसह ठाणे, नवी मुंबई ,कल्याण-डोंबिवली, पनवेल आदी महापालिकेने नाट्यगृहाच्या भाड्यात जी सवलत दिली त्यामुळे अनेक नाट्य संस्थांना प्रयोग करणे सोयीचं गेलं, यादरम्यान अनेक चांगली नाटकं रंगभूमीवर आली व प्रेक्षकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.यातील अनेक नाटकांना पुरस्कारही मिळाले आहेत ते दोन वर्ष विसरले तर नाट्य व्यवसायाला बऱ्यापैकी उर्जित अवस्था आली आहे असं मला वाटतं. नाट्य निर्मिती क्षेत्रात व्यस्त असताना देखील नाट्य परिषदेच्या निवडणुकीत उभं रहावं असं आपणास का वाटलं?
-मी गेली अनेक वर्ष नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा सभासद आहे. पण गेली काही वर्षे मी पाहत आहे की नाट्य संमेलन घेण्या व्यतिरिक्त ठोस काही होताना दिसलं नाही. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने व्यावसायिक रंगभूमी बरोबरच बालरंगभूमी,प्रायोगिक रंगभूमी आदी क्षेत्रात काम करण्याचे व त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मध्यवर्ती शाखा व महाराष्ट्रातील सर्व शाखातून निवडून आलेले प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे चांगलं काम कसं करता येईल यासाठी प्रयत्न हवेत.
आपलं पॅनल विजयी झालं तर सर्वप्रथम कोणत्या गोष्टींना प्राधान्य राहील?
प्राधान्याने यशवंत नाट्यगृह येथील त्रुटी दूर करून ते पुन्हा लवकरात लवकर कसे सुरु करता येईल यासाठी प्रयत्न राहील तसेच बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी व व्यावसायिक रंगभूमीला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यावर भर राहील व त्यावर अधिक लक्ष दिले जाईल तसं पाहिले तर कोरोना काळात पदावर नसताना देखील मी, प्रशांत दामले आदींनी अनेक कामे केली आहेत .नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याकरिता मंत्री महोदय,मनपा आयुक्त यांच्या भेटी घेतल्या .या सगळ्यांनी आम्हाला मदत केली. त्याचबरोबर नाटकाचे सेट ठेवण्यासाठी व पार्किंग साठी मुंबई मनपाकडून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले .थोडक्यात काम करण्यासाठी तुम्ही पदावरच असणं आवश्यक नाही तर त्याकरिता काम करण्याची मानसिकता हवी व तेवढा वेळ देऊन काम केलं पाहिजे ,असं माझं मत आहे. नाट्यगृह सुरू करण्याबरोबरच रंगमंच कामगारांना वैद्यकीय योजना, विमा पॉलिसी यावर काम करणं अशा अनेक गोष्टी प्राधान्याने हाती घेतल्या जातील