मुंबई: कस्तुरबा हॉस्पिटलने ग्लोबल हॉस्पिटलचा ५ धावांनी चुरशीचा पराभव करून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू महेश सणगर, डॉ. परमेश्वर मुंडे, कल्पेश भोसले, मंगेश आगे यांच्या दमदार खेळामुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा विजय सुकर झाला. अष्टपैलू महेश सणगर व महेश गोविलकर यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, धर्मेश स्वामी, प्रदीप क्षीरसागर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
ग्लोबल हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून कस्तुरबा हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसले (२४ चेंडूत २७ धावा), महेश सणगर ( ३१ चेंडूत ३३ धावा), डॉ. परमेश्वर मुंडे (१७ चेंडूत १९ धावा), मंगेश आगे (१४ चेंडूत २६ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ९ बाद १३७ धावा फटकाविल्या. आशिष जाधव (१५ धावांत ३ बळी) व कपिल गमरे (१२ धावांत ३ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केली. ग्लोबल हॉस्पिटलने प्रत्युत्तर देतांना सलामीवीर दयानंद पाटील (३९ चेंडूत २८ धावा) व निलेश देशमुख (२३ चेंडूत २८ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या महेश गोविलकरची (२४ चेंडूत ३८ धावा) आठवी विकेट मिळताच कस्तुरबा हॉस्पिटलने ग्लोबल हॉस्पिटलला ८ बाद १३२ धावसंख्येवर थोपविले आणि अंतिम फेरीत धडक दिली. महेश सणगर (१६ धावांत ३ बळी) व डॉ. परमेश्वर मुंडे (१९ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.