खूप लोकं म्हणतात रवी तू खूप समाजसेवा करतो राव, तुला प्रवासामुळे खूप संधी मिळतात असं करायला. पण मला वाटते असे काही नसते. प्रत्येकाला आपल्या सभोवताली संधी असते, गरज आहे ती फक्त *नजरेची.* डोळे आणि मन उघडे असेल तर दिसते आपल्याला.
फक्त ती *नजर* हवी, बस, जमलंच मग.
असो तर झालं असं,
वेळ सकाळी 10 ची. तपोवन एक्सप्रेसने औरंगाबादला निघालो होतो. रिझर्वेशन असल्याने सीटचं टेंशन नव्हतं पण सीटपर्यंत पोहचायला 10 मिनिट लागले. कुणी जर या मार्गावर तपोवन, जनशताब्दी या गाड्यांनी कधी प्रवास केला असेल तर त्यांना माहीत आहे की किती भयानक गर्दी असते या गाड्यांना 12 ही महिने. त्यात मुंगीला ही घुसायला जागा नसताना खाद्य विक्रेते दर एकमिनिटाला 5 ते 10 लोक गर्दी तुडवत असतात. रिझर्वेशन डबा हे काय असते हे पण लोकांना जणू माहीतच नसते, आरक्षित लोकांपेक्षा अनारक्षित लोकं 4 पट असतात बोगीत. अश्या भाऊ गर्दीत बरीच लोकं खाली बसलेले असतात.
माझ्या सीटपासून तीन सीट पुढे खाली एक 75 वर्षाचे म्हातारे बाबा बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाणी विक्रेत्याला विचारत होते,
बाबा : केवढ्याला रं दादा पाणी.
विक्रेता : 20रु बाबा, देऊ का ?
बाबा : नगं
असं दोन तीन वेळा झालं आणि माझं लक्ष गेलं. मी समजलो बाबांकडे पैसे नसतील किंवा कमी असतील. मी पटकन माझी बाटली काढली आणि उठलो पुढच्या सीटवर बसलेल्या सभ्य गृहस्थाला म्हणालो : साहेब एवढी बाटली त्या बाबांना देता का प्लिज ?
करडी नजर माझ्यावर टाकून त्या माणसाने जरा नाखुषीने ती बाटली त्या बाबाला दिली. बाबांनी बाटली घेतली काही विचार न करता गटगट पिऊन टाकली.
सर्व शांत झाले, कुजबुज सुरू झाली आजूबाजूला, बाजूच्या सिटवरच्या आजीने थम दाखवून माझं कौतुक केलं.
पण मी समजलो बाबा खूप तहानलेला आहे. एक पाणीवाला आला मी एक बाटली घेतली आणि परत पुढच्या माणसाला ती बाबांना द्यायला लावली, बाबांनी परत ती एका घोटात अर्धी संपवली आणि त्या माणसाकडे पाहत दोन्ही हात जोडले. आता मात्र तो माणूस जरा नरमला आणि बाबांना बोलला : बाबा मी नाही ह्या मागच्या साहेबांनी दिलं ते.
बऱ्याच सीटचे डोळे माझ्याकडे वळले.
पुढच्या सीट वर एक घरंदाज आणि श्रीमंत दिसणारी एक स्त्री बसली होती, उठली वळून पाहत मला म्हणाली : छान केलंत, आम्ही जवळ असून आम्हाला नाही सुचलं, पण या पुढे लक्षात ठेवेन, धन्यवाद तुमच्यामुळे चूक उमगली.
मी : थँक्स मॅम, फार काही मोठं नाही केलं, माझे आजोबा आठवले बाबांना पाहून, म्हणून पटकन पाणी दिलं बस.
ती : अहो पण हे पण सुचायला हवं नं ?
त्या बाईचा आवाज एवढा मोठा होता की सर्वच माझ्याकडे कौतुकाने पाहत होते.
मला जरा अवघडल्यासारखे झाले. मी मंद हास्य केलं बस.
बरीच चर्चा झाली त्यावर आणि सर्व शांत झालं, प्रत्येकाला वाटलं की हे आपण पण करू शकलो असतो.
पण मित्रानो खरी गम्मत अजून संपली नव्हती, कसं असतं ना, ती *नजर* च हवी.
गाडी मनमाड ला येऊन थांबली, बरीच लोकं खाली उतरतात चहा, नाश्त्याला. मी उठलो बाबांकडे गेलो आणि म्हटलं : बाबा या खाली.
बाबा : नको नको जागा जाईल म्यावाली.
मी : नाही जाणार या.
बाबा खाली आले,
मी : बाबा काही खायचं का?
बाबा : नको
मी : का? तुम्ही तर उपाशी आहात, दीड बाटली घोटात पिणारा माणूस म्हणजे उपाशी असणारच.
बाबांच्या डोळ्यात पाणी आले.
बाबा : काल दुपार धरून अन्नाचा कण नाही बा पोटात.
मी : आलं लक्षात बाबा, या काय घेता सांगा.
बाबा : भजी घे बाबा, नको उगा तुला फटका.
एक प्लेट भजी, दोन पाव,आठ दहा मिरच्या, चार इडल्या, चटणी, घेऊन दिलं. म्हटलं बाबा बसा इथंच घ्या खाऊन, गाडी थांबते 20 मिनिटे.
खाऊन झालं आणि बाबा आणि मी मस्त चहा पिलो.
सर्व मंडळी खिडकीतून आमच्याकडे पाहत होती.
रेल्वेने हॉर्न दिला, आत आलो, आपापल्या जागेवर बसलो.
मघाची ती घरंदाज स्त्री उठली आणि म्हणाली : सर करोडपती आहे मी घरची नेहमी कारनेच प्रवास असतो. पण आज ट्रेनने यावे लागले काही कारणांनी, पण येऊन आज सार्थक झालं माझं, डोळे उघडले कायमचे आणि तुम्ही तर परत बाबांना खायला देऊन आमच्या परत कानाखाली मारली. एवढं पाणी पिल्यावर आम्हाला का नाही सुचलं हे.
पण ,भाऊ म्हणू का तुम्हाला ?
मी : हो हो का नाही.
ती: भाऊ शपथ घेते की यापुढे एकही संधी नाही सोडणार कुणाला मदत करायची. मी एक शिक्षिका ही आहे पण आज जाणवलं की अजून खूप शिकायचंय आयुष्यात.
मी काय बोलणार यावर,
म्हटलं ताई जगात वाईट कुणीही नसतं, तुम्ही नका मनाला लावून घेऊ.
संधी आपल्या आजूबाजूलाच असतात,,,
फक्त ती *नजर* हवी बस.