MUMBAI/ NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने धडक दिली. अतिशय चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने कप्तान प्रदीप क्षीरसागर, जय तामोरे, सुधाकरन अब्राहम, अरुण पारचा यांच्या दमदार खेळामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा २४ धावांनी पराभव केला. कप्तान डॉ. हर्षद जाधव, अष्टपैलू सुशांत गुरव, भावेश डोके, डॉ.मनोज यादव यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे आव्हान संपुष्टात आले. अष्टपैलू प्रदीप क्षीरसागर व सुशांत गुरव यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन केईएम हॉस्पिटल क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सीताराम वांद्रे, डॉ. ईब्राहम शेख, डॉ. हर्षद जाधव, डॉ. मनोज यादव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी गौरविले.
शिवाजी पार्क मैदानात सेव्हन हिल्स हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. कप्तान प्रदीप क्षीरसागर (१७ चेंडूत २० धावा), जय तामोरे (२७ चेंडूत २१ धावा), सुधाकरन अब्राहम (१६ चेंडूत २० धावा), अरुण पारचा (१६ चेंडूत नाबाद २६ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १३५ धावांचा टप्पा गाठला. कप्तान डॉ. हर्षद जाधव (२३ धावांत २ बळी), डॉ. मनोज यादव (२७ धावांत २ बळी) व सुशांत गुरव ( १५ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. अष्टपैलू सुशांत गुरव ( ३० चेंडूत ३१ धावा) व भावेश डोके (२७ चेंडूत ३१ धावा) यांच्या फलंदाजीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटल ३ बाद ८० धावा अशा सुस्थितीत होता. परंतु दोघांच्या विकेट घेण्यात अष्टपैलू प्रदीप क्षीरसागरची (२० धावांत ४ बळी) फिरकी गोलंदाजी यशस्वी ठरताच ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला १८.५ षटकामध्ये १११ धावांत गुंडाळले. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने २४ धावांनी शानदार विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली.