मैत्रीचं नातं अधोरेखित करत दोस्तीची नवी व्याख्या सांगणारा ‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मुहूर्तापासून पोस्टर रिलीजपर्यंत कायम चर्चेत राहिलेला हा चित्रपट मैत्रीचे नवे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटातील मित्रांच्या जोडगोळीला चारचौघींच्या ग्लॅमरचा तडका देण्यात आला आहे. या चारचौघी कोण? याबाबत जाणून घेण्यास रसिकही आतुरले आहेत. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विहान सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा सांगणाऱ्या ‘रूप नगर के चीते’ मध्ये करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांच्या मैत्रीला मुग्धा चाफेकर, हेमल इंगळे, आयुषी भावे आणि सना प्रभू यांच्या ग्लॅमरचा तडका लाभला आहे. या चौघींनीही मनोरंजन विश्वासोबतच सौंदर्यस्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मुंबईकर असलेल्या मुग्धाने टेलिव्हीजनवर खूप काम केलं आहे. ‘द सायलेन्स’ या मराठी चित्रपटासाठी तिनं पदार्पणातील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पटकावला आहे. ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज’ या गाजलेल्या मालिकेत मुग्धाने साकारलेल्या राजकुमारी संयोगिताचं खूप कौतुक झालं होतं. आजही ती टेलिव्हीजनवर सक्रिय आहे. कोल्हापूरकर असणाऱ्या हेमल इंगळेने अल्पावधीतच आपला वेगळा चाहतावर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे. वेगवेगळ्या सौंदर्यस्पर्धांमध्ये चमकलेल्या हेमलने ‘अशी ही आशिकी’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘१९६२’ या हिंदी वेबसीरीज मध्ये ही ती झळकली. छोटया पडद्यावरील ‘विद्रोही’ या मालिकेतील तिची मध्यवर्ती भूमिकाही चांगलीच गाजली.
मूळची रत्नागिरीची असलेली सना प्रभू सध्या मुंबईतील युपीजी कॅालेजमध्ये ‘मास मीडिया अँड कम्युनिकेशन्स’ करतेय. २०१८ मध्ये झालेल्या ‘मिस पुणे’ या सौंदर्यस्पर्धेत ती फायनलिस्ट होती. उत्तम डान्सर असलेली सना ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाद्वारे सिल्व्हर स्क्रीनवर एन्ट्री करतेय. मागील सात वर्षांपासून प्रोफेशनल डान्सर म्हणून सिनेसृष्टीत कार्यरत असणाऱ्या आयुषी भावेने आजवर फराह खान, गीता कपूर, प्रभू देवा अशा अनेक नामवंत कोरिओग्राफर्ससोबत काम केलं आहे. नृत्यात प्रावीण्य मिळवलेली आयुषी २०१८ मध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचे व्यासपीठ असलेल्या ‘श्रावण क्वीन’ ची विजेती ठरली होती. सना प्रमाणे ‘रूप नगर के चीते’ हा आयुषीचाही पदार्पणातील मराठी चित्रपट आहे.
‘रूप नगर के चीते’मध्ये या चौघींची अदाकारी पहायला मिळणार असल्याचं गुपित जरी उघड करण्यात आलं असलं तरी मुग्धा, हेमल, सना आणि आयुषी नेमक्या कोणत्या भूमिकांमध्ये झळकणार ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. दोन मित्रांच्या कथेत या चौघी नेमकं काय करणार? याची उत्सुकता प्रेक्षकांनाही लागली आहे. दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनीच कार्तिक कृष्णन यांच्या साथीनं या चित्रपटाचं लेखन केलं आहे. डिओपी संतोष रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गोरक्षनाथ खांडे यांनी संकलन केलं आहे. जय अत्रे यांनी लिहिलेल्या गीतांना प्रख्यात मल्याळम संगीतकार शान रेहमान आणि मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे. मुजीब माजीद यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, साऊंड डिझायनिंगचं काम राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर सबनवार यांनी पाहिलं आहे. वेशभूषा विहान सूर्यवंशी, सागर तिर्लोतकर यांनी केली असून, रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. स्टेनली डि’कोस्टा, विहान सूर्यवंशी, संतोष रेड्डी यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर आहेत. मालविका शाह या चित्रपटाच्या हेड ऑफ़ प्रोडक्शन आहेत तर प्रशांत बिडकर प्रोडक्शन डिझाईनर आहेत.