अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई: क्रीडा प्रतिनिधी/NHI
12 वर्षीय ईशान तेंडोलकरने (एलो1238) अव्वल मानांकित आणि आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीला सहाव्या एसबीआय लाइफ अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसर्या फेरीत बरोबरीत रोखले. स्पर्धेतील हा आजवरचा सर्वात धक्कादायक निकाल ठरला आहे.
पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत टॉप बोर्डवर खेळताना विक्रमादित्यने राणी प्याद्याने मॉडर्न बेनोनी बचावासह आक्रमक सुरुवात केली. मात्र ईशानने काळ्या मोहर्यांसह खेळताना त्याला चोख प्रत्युत्तर दिले. विक्रमादित्यने ईशानला मागे टाकण्यासाठी त्याच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. परंतु, ईशानने त्याच्या प्रत्येक चालीला जशास तसे उत्तर दिले. शेवटी मॅरेथॉन 96 चालींनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंनी बरोबरी मान्य केली.
दुसर्या ते सहाव्या बोर्डवर दुसरा मानांकित सौरभ खेर्डेकर (एलो 2090), तिसरा मानांकित राघव (एलो 2066), चौथा मानांकित अर्णव खेर्डेकर (एलो 1722, सहावा मानांकितगुरु प्रकाश (एलो 1619) आणि सातव्या मानांकित योहान बोरीचा यांनी (यलो 1639) आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
तिसर्या फेरीअखेर 12 खेळाडूंनी प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थान राखले आहे. 9 खेळाडूंच्या खात्यात अडीच गुण आहेत. इंडिया चेस स्कूल आयोजित.3 लाख रुपयांची एकूण बक्षिसे असलेल्या अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे अजून सहा राउंड शिल्लक आहेत.
तिसर्या फेरीतील मुख्य निकाल: 1. विक्रमादित्य (2.5) बरोबरी वि. इशान (2.5), 2. अथर्व (2) पराभूत वि. सौरभ(3), 3. राघव (3) विजयी वि. सारा (2), 4. शिरीष (2) पराभूत वि. अर्णव (3), 5. गुरू प्रकाश (3) विजयी वि. वेदांशी (2), 6. योहान (3) विजयी वि. करण (2), 7.श्रावण (2) पराभूत वि. षण्मुख (3), 8. दर्श (3) विजयी वि. श्रीरामला (2), 9. अर्जुन (2) पराभूत वि.आयुष (3), 10. विहान (2) पराभूत वि. अथर्व.