क्रीडा प्रतिनिधी/NHI/मुंबई
अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर आणि माजी राष्ट्रीय ब बुद्धिबळ विजेता रेल्वेचा विक्रमादित्य कुलकर्णी (एलो २२५१) याने सहाव्या एसबीआय लाइफ अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विक्रमादित्य कुलकर्णीने पहिल्या फेरीच्या डावात अहान कटारुका याचा सहज पराभव करत आगेकूच केली.
अन्य पटावरही मानांकित बुद्धिबळपटूंनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. दुसऱ्या मानांकित फिडे मास्टर सौरव खेडेकर (एलो २०९०) आणि तिसऱ्या मानांकित राघव श्रीवास्तव (एलो २०६०) यांनीही अनुक्रमे आदित्य आणि गणेश्वर या आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला.
सहा दिवसांच्या या स्पर्धेत देशभरातील ६१ फिडे मानांकित खेळाडूंसह जवळपास १४० बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला आहे. इंडिया चेस स्कूलतर्फे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, एसबीआय लाइफच्या उपाध्यक्ष आणि संचालिका डॉ. एलिना रेमिझोव्हा यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एसबीआय लाइफचे विभागीय प्रमुख श्री. अभय दास तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर सागर शाह आणि महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सहसचिव श्री. पी. बी. भिलारे उपस्थित होते.
पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण निकाल
१) विक्रमादित्य विजयी वि. अहान
२) आदित्य पराभूत वि. सौरव
३) राघव विजयी वि. गणेश्वर
४) अक्षता पराभूत वि. अर्णव
५) संजीव विजयी वि. अनंत