अनेक चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री. आजवर साकारलेल्या बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र ‘सरी’ चित्रपटात रितिका श्रोत्री एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार असून आजवरच्या भूमिकेपेक्षा ही तिची खूपच वेगळी भूमिका आहे. सोज्वळ, अभ्यासू आणि रोमँटिक ‘दिया’चा हा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल !
आपल्या भूमिकेबद्दल रितिका श्रोत्री म्हणते, ” सरीमधील दियाची भूमिका साकारणे, माझ्यासाठी समाधान देणारा अनुभव होता. कारण याआधीच्या माझ्या सर्व चित्रपटांमध्ये मी बहिर्मुख भूमिका साकारल्या आहेत. ज्यात मी खूपच बिनधास्त दिसली आहे. त्या मुलींना जे वाटते, ते त्या ठामपणे व्यक्त करतात. मात्र या चित्रपटात ‘दिया’ अशी आहे, जिला खूप काही वाटते, खूप काही बोलायचे आहे, परंतु ती अंतर्मुख असल्यामुळे ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप वेगळा आणि सुंदर अनुभव आहे.”
कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केले असून ‘सरी’मध्ये रितिका श्रोत्रीसह अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘सरी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.