MUMBAI/ NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची सलामी लढत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने जिंकली. कप्तान प्रदीप क्षीरसागर, प्रफुल मारू, सुनील बांदवलकर, मुत्तू इसाकी यांच्या दमदार खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई क्रिकेट संघाचा २० धावांनी पराभव केला. शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनील खेळपट्टीवर स्पर्धेचे शानदार उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रिकेटपटू अनंत सुर्वे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक अनिकेत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.
उद्घाटक अभय हडप यांनी दिलेला नाणेफेकीचा कौल ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. केडीए हॉस्पिटल विरुध्द सलामीवीर प्रदीप क्षीरसागरने (४४ चेंडूत ३७ धावा) प्रफुल मारू (२१ चेंडूत २५ धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची तर मुत्तू इसाकी (१७ चेंडूत २१ धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ९ बाद १३५ धावा फटकाविल्या. स्वप्नील चव्हाण (२६ धावांत ३ बळी) व अब्दुल अन्सारी (१८ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली.
कप्तान संदीप देशमुख (४४ चेंडूत ५१ धावा) खेळपट्टीवर असेपर्यंत केडीए हॉस्पिटलची २ बाद ९२ धावा अशी विजयी वाटचाल होती. परंतु अर्धशतकवीर संदीपची विकेट सुनील बांदवलकरने (२२ धावांत ३ बळी) मिळविली आणि ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने केडीए हॉस्पिटलला २० षटकात ७ बाद ११५ धावसंख्येवर रोखून २० धावांनी साखळी विजय मिळविला. क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव यांनी सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रदीप क्षीरसागर व संदीप देशमुख यांना प्रदान केला. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.