प्रतिनिधी/NHI
मुंबई : ऑफ ब्रेक गोलंदाज नीलाक्षी तलाटीने आठ चेंडूमध्ये एकही धाव न देता विजय क्रिकेट क्लबचे ५ फलंदाज गारद केल्यामुळे डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने १० विकेटने महिला क्रिकेट लीग स्पर्धेमधील साखळी सामना जिंकला. नीलाक्षीला डावखुरी मध्यमगती गोलंदाज वेधासी पाटीलने ८ धावांत ४ बळी घेत उत्तम साथ दिली. परिणामी विजय क्रिकेट क्लबचा डाव ८.२ षटकात अवघ्या २५ धावांत गडगडला. डॅशिंग स्पोर्ट्स क्लबने विजयी लक्ष्य एकही विकेट न गमावता चौथ्या षटकाला २९ धावा फटकावून पार केले.
दुसऱ्या सामन्यात डॉ.डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने वरळी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव केला. नाणेफेक जिंकून पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने क्षेत्ररक्षणाचा अचूक निर्णय घेतला. प्रगण्या कोळीचा (नाबाद १९ धावा) अपवाद वगळता वरळी क्लबच्या फलंदाजांना प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी २० षटकात ४ बाद ६२ धावसंख्येवर रोखले. ख़ुशी ठाकूरच्या नाबाद ४३ धावांमुळे डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकॅडमीने ५.२ षटकात २ बाद ६५ अशी विजयी धावसंख्या सहज रचली.