मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून चौफेर टीका केली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख अलीबाबा आणि त्याचे चाळीसजण असा केला. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
राज ठाकरे भाषणात म्हणाले, “जूनमध्ये सगळा तमाशा झाला. अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले. त्यांना चोर म्हणता येणार नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच (उद्धव ठाकरे) कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे कुणालाच भेटायला तयार नव्हते. एक आमदार आपल्या मुलाला घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला गेला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या मुलाला बाहेर ठेवलं आणि आमदाराला भेट दिली. हे असं वागल्यानंतर २१ जूनला कळालं आपल्याला एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले. मग पुढे गुवाहाटीला गेले.”