MUMBAI/NHI
जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य कस्तुरबा हॉस्पिटल क्रिकेट संघाला १९ धावांनी हरवून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे झालेल्या क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत तृतीय स्थानाचा पुरस्कार पटकाविला. विजेत्यांना आमदार सचिनभाऊ चषक देऊन क्रिकेटपटू धर्मेश नाडकर्णी, चंद्रकांत करंगुटकर, मनोहर पाटेकर, प्रदीप क्षीरसागर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रवीण सोळंकी व रोहन ख्रिस्तियन यांनी मिळविला.
क्रॉस मैदानावर नाणेफेक जिंकून जे.जे. हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करतांना कस्तुरबा हॉस्पिटल संघाच्या गोलंदाजांचा यशस्वी समाचार घेतला. प्रवीण सोळंकी (१६ चेंडूत २४ धावा), राकेश शेलार (१६ चेंडूत ३१ धावा), सुशांत जाधव (८ चेंडूत नाबाद १८ धावा), अभिजित मोरे (१८ चेंडूत नाबाद ४४ धावा) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलने ३ बाद १३४ धावांचा पल्ला गाठला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना अष्टपैलू रोहन ख्रिस्तियन (२१ चेंडूत नाबाद ४१ धावा), राहुल जाधव (२१ चेंडूत २८ धावा), कल्पेश भोसले (१२ चेंडूत २२ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला ५ बाद ११५ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. प्रवीण सोळंकी (१९ धावांत ३ बळी) व अक्षय सावंत (१९ धावांत १ बळी) यांनी अचूक मारा केला. परिणामी जे.जे. हॉस्पिटलने १९ धावांच्या फरकाने सामना जिंकून तृतीय स्थानावर झेप घेतली.