मुंबई/ NHI/काशिनाथ माटल
‘अनेकांचा’ जन्म आव्हानं पेलण्यासाठी झालेला असतो.ज्या व्यक्ती आव्हाने पेलण्यात यशस्वी होतात,त्याच व्यक्ती समाज मनावर आपलं नाव कोरून ठेवतात.महाराष्ट्रात अशा कर्तृत्ववान व्यक्तींची जणू खाणच आहे.अगदी यशवंतराव चव्हाण,प्रबोधनकार ठाकरे,वसंतदादा पाटील पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे पर्यंत अनेक महनीय नेत्यांचे कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहाते.
कविवर्य विं.दा.करंदीकर आपल्या एका कवितेत म्हणतात,”असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर, ‘नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.” याच काव्य पंक्ती डोळ्यासमोर ठेवून अलीकडे जनसान्यामध्ये अधिक वेगाने पुढे येणारे कामगार व राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व सचिनभाऊ अहिर यांचा विचार केला तर, त्यांना त्या काव्य पंक्ती तंतोतंत लागू पडतात.दि.२१ मार्च रोजी त्यांचा ५१ वा वाढदिवस संपन्न होत आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर ते आज उभे आहेत.त्यांनी आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा काळ या निमित्ताने डोळ्यासमोरून तरळून गेल्या शिवाय रहात नाही!
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कानोसा घेताना,वरील उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आदर्श त्यांनी मनोमनी बिंबवून आयुष्य मार्गक्रमण केलंय. म्हणूनच यशाच्या वाटेवरून,उत्तुंगतेच्या दिशेने जाताना त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक बहरलेलं दिसते.
स्वामी विवेकानंदांचे एक वचन आहे,”शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान!” सचिनभाऊ अहिर यांच्या आजच्या यशाचं परिमार्जन करु लागलो की,नेमकं स्वामी विवेकानंदांचे हे वचन ते जगताना दिसतात.
साधारण १९९३-९४ च्या सुमारास त्यांचा गिरणी कामगार चळ वळीत प्रवेश झाला.ते भायखळ्याच्या खटाव मिलचे कामगार! उच्च शिक्षण घेऊनही सार्वजनिक क्षेत्रात पोहोचण्यासाठी त्यांनी चरितार्थासाठी गिरणी क्षेत्र निवडलं .सामाजिक कामाचा ओढा आणि इतरांसाठी काही करण्याची इर्षा या विचारातून ते राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या कार्याकडे ओढले गेले.संघटनेची विविध पदे भूषवून १९९५-९६ पासून गेली गेली २५वर्षे संघटनेचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. संघटनेला त्यांच्या रूपाने बहुआयामी नेतृत्व लाभले.गं.द.आंबेकरजिंचा वारसा लाभलेल्या या संघटनेला त्यांनी शिक्षण,सहकार, क्रीडा, सामाजिक आदी क्षेत्रात वरच्या स्थानावर नेले.अर्थात सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यांच्या खांद्याला खांदा देत भक्कम आधार दिलाय,तर खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शशिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी पदाधिकार्यांचे सहकार्य तितकेच मोलाचे ठरते आहे.गत वर्षी संघटनेचा अमृतमहोत्सव संपन्न झाला,या निमित्ताने त्यांचे कामगार चळवळीतील कुशल नेतृत्व अधोरेखित झाले आहे.
त्यांनी गिरणी कामगार चळवळीत प्रवेश केलेला तो काळ कसोटीचा होता.१९९१ मध्ये खुली अर्थव्यवस्था जन्माला आलेली.जागतिकी करणाच्या वावटळीत मुंबईतील अनेक गिरण्या बंद पडून गिरणी कामगारांची कोट्यवधी रुपयांची देणी मिळाली नव्हती.सचिनभाऊंनी कधी रस्त्यावर उतरून तर कधी न्यायालयाच्या मार्गाने ती देणी मिळवून दिली.आज बंद एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर तर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यशस्वी नेतृत्व उभे करून केंद्रावर अंकुश निर्माण केला आहे. केंद्र सरकारने जे कामगार कायद्यात बदल केले आहेत.त्या विरूद्धही ते त्याच इर्शेने लढत आहेत.
सचिनभाऊ अहिर यांचे नेतृत्व गिरणी कामगारांपुरते सीमित राहिले नाही.त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाची सन १९९६ मध्ये स्थापना करुन,विविध उद्योगांतील कामगारांना एका छताखाली एकत्र आणले.आज नवीमुंबई, रायगड, पुणे,कोल्हापूर ते अगदी गुजरात सोनगड पर्यंत युनियनचे कार्य विस्तारले असून, कामगारांचा खरा तारणहार ही बिरुदावली त्यांनी निर्माण केली.त्या शिवाय महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियन,गोदी कामगार युनियन या सारख्या अनेक मोठ्या स्वतंत्र युनियनचेही ते नेतृत्व करीत आहेत.
याच भरीव कामाच्या ताकदीवर ते मुंबईतून शिवडी- वरळी मतदार संघातून तीन वेळा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी हॅट्ट्रिक साधली.राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जे भरीव कामकेले, त्यातून लोकमानसावर त्यांनी ठसा उमटवलेला दिसतो.
सचिनभाऊ अहिर यांचे नेतृत्व तळागाळातून उदयाला आलेले आहे.मग ते राजकारणातून असेल किंवा कामगार चळवळीतून असेल, त्यांनी पहिलं म्हणजे माणूस जोडण्याचे काम केले आहे.आज ते शिवसेनेचे उपनेते, प्रवक्ते,भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि पुणे जिल्हाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.जिथे जिथे त्यांच्या सभा होत आहेत.तिथे तिथे कार्यकर्त्यांचा मोहोळ त्यांच्या पाठीशी असलेला दिसतो आहे.हिच त्यांची खरी ताकद आणि अनंत संघर्षातून मिळवलेलं यशस्वी नेतृत्व आहे.तिच त्यांच्या नेतृत्वाची खरी किमया आहे!–