MUMBAI/NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे झालेली क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा लीलावती हॉस्पिटलने जिंकली. कप्तान धर्मेश स्वामी, अष्टपैलू रुपेश कोंडाळकर, फिरकी गोलंदाज अंकित साळसकर आदींच्या अप्रतिम खेळामुळे लीलावती हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा ८ विकेटने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आमदार सचिनभाऊ अहिर यांनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी क्रिकेटपटू धर्मेश नाडकर्णी, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, क्रिकेटपटू शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.
क्रॉस मैदानामधील अंतिम सामन्यात लीलावती हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला अनुकूल ठरला नाही. फिरकी गोलंदाज अंकित साळसकर (१९ धावांत ४ बळी), डावखुरा फिरकी गोलदांज रुपेश कोंडाळकर (८ धावांत २ बळी) व विशाल शिंदे (१२ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा निम्मा संघ अवघ्या ७ धावांत गारद झाला. प्रफुल मारूने (३५ चेंडूत २४ धावा) डाव सावरण्याचा प्रयत्न करूनही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा डाव १४.४ षटकात ६४ धावांत गडगडला.
विजयी लक्ष्य आटोक्यात राहिल्यामुळे सलामीवीर रुपेश कोंडाळकर (१२ चेंडूत २१ धावा), मनोहर पाटेकर (११ चेंडूत १५ धावा), धर्मेश स्वामी (१३ चेंडूत नाबाद २१ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केली आणि लीलावती हॉस्पिटलने ७ षटकात २ बाद ६५ धावा फटकावून विजेतेपदाचा आमदार सचिनभाऊ चषक जिंकला. याप्रसंगी ५१ व्या वाढदिवसानिमित्त आमदार सचिनभाऊ अहिर यांचा सर्व रुग्णालयीन क्रिकेटपटूंच्यावतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू रुपेश कोंडाळकर, उत्कृष्ट फलंदाज धर्मेश स्वामी व उत्कृष्ट गोलंदाज प्रदीप क्षीरसागर ठरले. विजेत्या-उपविजेत्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार देऊन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रिकेटप्रेमी मनोज होलमुखे, सुरेश मोरे, विलास डांगे आदी मंडळीनी गौरविले.