MUMBAI/NHI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ-आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध लीलावती हॉस्पिटल संघांमध्ये २० मार्च रोजी सकाळी ९.३० वा. एम.बी. युनियन-क्रॉस मैदान येथे अंतिम लढत होईल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांचा सन्मान होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सिल मेम्बर अभय हडप, क्रिकेटप्रेमी धर्मेश नाडकर्णी, आरएमएमएसचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, विलास डांगे आदी उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ रुग्णालयीन क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या हंगामात दोन विजेतेपद पटकावून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा क्रिकेट पताका राज्यात उंचावला आहे. कप्तान प्रदीप क्षीरसागर यांच्या गाठीशी इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटचा दांडगा अनुभव असून सलामीवीर फलंदाज व उत्तम फिरकी गोलंदाज असा त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या सोबतीला आक्रमक फलंदाज रोहन महाडिक, शंतनू मोरे, प्रफुल मारू, यष्टीरक्षक इसाकी मुत्तू, सुदेश यादव, सुधाकर एब्राहम आदी फलंदाजीचे बळ असून प्रदीप क्षीरसागरसह अष्टपैलू रोहन महाडिक, सुनील बांदवलकर, अरुण पारशां, प्रफुल मारू, सुदेश यादव यांच्या अचूक गोलंदाजीचे वलय आहे. त्यामुळे स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची विजयीदौड फॉर्मात आहे. तरीही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला बलाढ्य लीलावती हॉस्पिटल संघाविरुद्ध यंदाच्या हंगामात विजेतेपदाची हॅटट्रीक साधणे, सोपे नसेल.
लीलावती हॉस्पिटल संघाचे कप्तान धर्मेश स्वामी यांनी ज्युनियर क्षेत्रापासून मुंबईच्या क्रिकेटवर दरारा निर्माण केला असून उत्तम फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून धर्मेशचा नावलौकिक आहे. अष्टपैलू रुपेश कोंडाळकरची सलामी फलंदाजी व फिरकी गोलंदाजी लीलावती हॉस्पिटल संघाला नेहमीच उपयुक्त ठरली आहे. सलामीवीर मनोहर पाटेकर, अंकित साळसकर, यष्टीरक्षक वीरेश दांडेकर, पराग जाधव, संदेश पंधेरे यांची आक्रमक फलंदाजी आणि फिरकी गोलंदाज प्रवीण पांचाळ, अष्टपैलू अंकित साळसकर, विशाल शिंदे, योगेश जांभळे यांची प्रभावी गोलंदाजी यशस्वी ठरल्यास प्रतिस्पर्धी संघाला अडचणीचे ठरेल. अंतिम फेरीमधील दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे क्रिकेट शौकिनांना आमदार सचिनभाऊ चषक क्रिकेट स्पर्धेचा दर्जेदार अंतिम सामना आणि त्यानंतर कप्तान डॉ. परमेश्वर मुंडे यांचा कस्तुरबा हॉस्पिटल संघ विरुध्द अष्टपैलू नरेश शिवतरकर यांच्या नेतृत्वाखालील जे.जे. हॉस्पिटल संघ यामध्ये तृतीय क्रमांकाची लढत पाहण्यास मिळेल.