MUMBAI/NHI
तोडीस तोड खेळ करीत रंगलेल्या सामन्यात अक्षय चोरघे व निर्मल स्वामी जोडीने अहमद पठाण व रघु कलाल जोडीचा ७-५ असा चुरशीचा पराभव केला आणि शिवाजी पार्क जिमखानातर्फे टेनिसपटू व संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी दुहेरी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर ‘सेक्युरिटी एचक्यू’ कंपनी पुरस्कृत स्पर्धेमध्ये देशाच्या विविध भागातील टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक उत्तम खेळ करीत आहेत.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या अन्य सामन्यात भावेश नवलु-विजय गिरी जोडीने प्रवीण जाधव-संजय येलवे जोडीवर ६-१ असा, विनय नवलु- हेमंत मांगेला जोडीने शिवा-गोवर्धन जोडीवर ६-३ असा, विक्रम कोरगावकर-देवेन पिवार जोडीने कैलाश दुबे-शिव सिंग जोडीवर ६-० असा तर अक्षय इनामे-मंगेश इनामे जोडीने अजय नवारे-संजय पटेल जोडीवर ६-३ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रु.८०,०००/- रक्कमेचे पुरस्कार असून अंतिम विजेत्यास रोख रुपये वीस हजार व दादा खानोलकर स्मृती चषक दिला जाणार आहे.