MUMBAI /NHI
कप्तान प्रदीप क्षीरसागरच्या अष्टपैलू खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य कस्तुरबा हॉस्पिटलचा ५ विकेटने पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. सलामीवीर अंकुश जाधवने अष्टपैलू खेळ करूनही कस्तुरबा हॉस्पिटल संघाला पराभव पत्करावा लागला. अष्टपैलू प्रदीप क्षीरसागर व अंकुश जाधव यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, अण्णा शिर्सेकर, क्रीडापटू प्रदीप परब, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, मनोहर देसाई व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींनी गौरविले.
शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध कस्तुरबा हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर अंकुश जाधव (४७ चेंडूत ४६ धावा), रोहन जाधव (२१ चेंडूत २३ धावा), महेश सनगर (९ चेंडूत १५ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही कस्तुरबा हॉस्पिटलचा डाव १८.३ षटकात ११४ धावसंख्येवर कोसळला. त्याचे श्रेय प्रदीप क्षीरसागर (१५ धावांत ४ बळी) व सुनील बांदवलकर (२४ धावांत ३ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीला ध्यावे लागेल. प्रत्युत्तर देतांना सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (२४ चेंडूत २५ धावा) व रोहन महाडिक (२४ चेंडूत २६ धावा) यांच्या पहिल्या विकेटसाठी ५२ धावांच्या भागीदारीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा विजयी पाया भक्कम झाला. त्यानंतर शंतनू मोरे (२६ चेंडूत २१ धावा ) व प्रफुल मारू (११ चेंडूत १५ धावा) यांच्या फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १५.३ षटकात ५ बाद ११८ अशी विजयी धावसंख्या रचली. डॉ. परमेश्वर मुंडे, महेश सनगर, अष्टपैलू अंकुश जाधव, रोहन ख्रिस्तियन यांनी कस्तुरबा हॉस्पिटलतर्फे विकेट घेणारी गोलंदाजी केली.