प्रतिनिधी/NHI/भास्कर कोर्लेकर
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आता फुलराणीच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. फिनक्राफ्ट मीडिया अमृता फिल्म्स आणि थर्ड एस इंटरटेनमेंट प्रस्तुत “ फुलराणी” हा चित्रपट येत्या 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या निमित्ताने प्रियदर्शिनीशी केलेली ही बातचीत….
या चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली ,यावर ती म्हणाली “ फुलराणी” सारखा चित्रपट आणि त्यात टायटल रोल करण्याची संधी मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.फुलराणी करता जेव्हा मला ऑडिशन द्यायला बोलावलं तेव्हा माझी या भूमिकेसाठी निवड होईल असं वाटलं नव्हतं, “तुला शिकवीन चांगलाच धडा” या गाजलेल्या दृश्यावर ऑडिशन द्यायचं होतं. एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं त्यामुळे पाठ करून सादर करणे हा माझ्यासाठी अवघड टास्क होता. पण मी मनाशी ठरवलं की आपल्याला जसं वाटते तसं करूया आणि तसं मी केलं देखील, आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशीच मला कॉल आला आणि ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं मात्र पहिल्याच मिटिंग नंतर विश्वास जोशी सरांनी मला लॉक केलं होत हे मला नंतर समजलं फुलराणीसाठी माझी निवड होणं आणि सुबोध भावे यांच्यासारख्या मोठ्या नटासमोर काम करणार आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता. “फुलराणी” बनणं हे माझ्यासाठी अनपेक्षित आणि सुखकारक होतं.
फुलराणी भूमिकेसाठी कशी तयारी केली, याबद्दल सांगताना ती म्हणाली “ती फुलराणी “मधील फुलराणी आणि यातील शेवंता तांडेल सारखी नाही त्यांचे स्वभाव, भाषा खूप वेगळी आहे. आगरी भाषा बोलायची होती ती देखील ठसक्यात ,त्या भाषेचा मान ठेवायचा होता. कुठेही आविर्भाव नको होता. हे सगळं जुळवून आणायला खूप मेहनत घ्यावी लागली. नवीन भाषा शिकायला मिळाली. कल्पेश पाटील यांची त्याकरिता मला खूप मदत झाली तसेच विक्रम गोखले सर सुबोध भावे आदी दिग्गज कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मला यात मिळाली. त्यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायलाही मिळालं.
चित्रपटाबाबत बोलताना प्रियदर्शनी म्हणाली की, दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आजच्या काळातील “फुलराणी” प्रेक्षकांसमोर अतिशय भव्य रीतीने समोर आणली आहे.ती अल्लड अवखळ असली तरी हुशार आहे. आपल्याकडे जे आहे त्याची लाज न बाळगता स्वतःला सिद्ध करण्याची तिची धडपड तिला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. प्रत्येकामध्ये एक फुलराणी असतेच त्याचा शोध ज्याचा त्याने घ्यायला हवा. यातील गाणीही श्रवणीय असून मला लावणीवर नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. ही फुलराणी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करील, आनंद देईल असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला