प्रतिनिधी/NHI
मुंबई : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत मीरा-भाईंदर लायन्स विरुध्द ठाणे टायगर्स यामध्ये १५ मार्च रोजी दुपारी १२.१५ वा. ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर होईल. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आमदार आशिष शेलार व एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. उपांत्य फेरीमध्ये मीरा-भाईंदर लायन्सने कल्याण टस्कर्सचा ८३ धावांनी तर ठाणे टायगर्सने वाशी वॉरीअर्सचा ८ विकेटने पराभव केला. मीरा-भाईंदर लायन्सचा मध्यमगती गोलंदाज अमित पांडेला सामनावीर पुरस्काराने प्रशिक्षक इक्बाल ठाकूर यांनी गौरविले. यावेळी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते.
पहिल्या उपांत्य फेरीत मीरा-भाईंदर लायन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६९ धावा फटकाविल्या. त्याचे श्रेय सलामीवीर सृजन आठवले (३९ चेंडूत ६६ धावा), अभिषेक श्रीवास्तव (१७ चेंडूत २३ धावा), जहांगीर अन्सारी (११ चेंडूत २६ धावा) यांच्या दमदार फलंदाजीला ध्यावे लागेल. फिरकी गोलंदाज अजय मिश्राने १६ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तर देतांना कल्याण टस्कर्सची फलंदाजी बहरली नाही. मध्यमगती गोलंदाज अमित पांडे (१५ धावांत ३ बळी) व ऑफ ब्रेक गोलंदाज अभिषेक श्रीवास्तव (२५ धावांत ४ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे कल्याण टस्कर्सचा डाव १४.४. षटकात ८६ धावसंख्येवर संपुष्टात आला. परिणामी मीरा-भाईंदरने ८३ धावांनी विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सलामीवीर जयदीप परदेशी (४७ चेंडूत ७२ धावा) व निखील पाटील (२९ चेंडूत ५४ धावा) यांच्या अर्धशतकी फलंदाजीमुळे वाशी वॉरीयर्सने ठाणे टायगर्स विरुद्ध २० षटकात ७ बाद १८१ धावांचा मोठा पल्ला गाठला. हेमंत बुचडेने २४ धावांत २ बळी घेतले. सलामीवीर अखिल हेरवडकर (४६ चेंडूत ६९ धावा) व परीक्षित वालसंगकर (५५ चेंडूत ८७ धावा) यांच्या आक्रमक १६० धावांच्या सलामी भागीदारीमुळे ठाणे टायगर्सने विजयी लक्ष्य १९.५ षटकात २ बाद १८५ धावसंख्या रचून साकारले.