प्रतिनिधी/ NHI
मुंबई : अष्टपैलू मनोज जाधव व प्रवीण सोळंकी यांच्या आठव्या जोडीने ७२ धावांची अभेद्य भागीदारी केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा ६ धावांनी पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जे.जे. हॉस्पिटलच्या प्रमुख फलंदाजांचा निम्मा संघ केवळ १५ धावांत डॉ. हर्षद जाधव, विशाल सावंत, अष्टपैलू सुशांत गुरव यांच्या गोलंदाजीने गारद करूनही सेव्हन हिल्स हॉस्पिटलला निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. अष्टपैलू मनोज जाधव व सुशांत गुरव यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव, चंद्रकांत करंगुटकर, विलास जाधव, महेश शेटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले..
शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द नाणेफेक जिंकून जे.जे. हॉस्पिटलला प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरुवातीला अनुकूल ठरला नाही. डॉ. हर्षद जाधव (१९ धावांत ३ बळी), विशाल सावंत (२० धावांत २ बळी), सुशांत गुरव (२७ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलचा निम्मा संघ अवघ्या १५ धावसंख्येवर तंबूत परतला. परंतु त्यानंतर प्रवीण सोळंकी (२९ चेंडूत नाबाद ३५ धावा) व मनोज जाधव (२९ चेंडूत नाबाद ३४ धावा) यांच्या आठव्या जोडीने नाबाद ७२ धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यामुळे जे.जे. हॉस्पिटलला मर्यादित २० षटकात ७ बाद १२५ धावांचे आश्वासक आव्हान सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द उभे करता आले. प्रत्युत्तर देतांना एका बाजूने सुशांत गुरवने (४३ चेंडूत ४३ धावा) सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा उत्तम किल्ला लढविला. परंतु इतर फलंदाजांची विकेट घेणारी गोलंदाजी अक्षय सावंत (१४ धावांत ४ बळी), अभिजित मोरे (१५ धावांत २ बळी), मनोज जाधव (२० धावांत १ बळी), जगदीश वाघेला (१८ धावांत १ बळी) यांनी केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १९.५ षटकात ११९ धावसंख्येवर गुंडाळला.