यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स निर्मित “कुणी गोविंद घ्या…? हे नाटक आता रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले असून येत्या 17 मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होत आहे.
कुणी गोविंद घ्या….? या नाटकाचे दिग्दर्शन व लेखन दीपेश सावंत यांनी केले आहे .यात प्रसाद रावराणे सिध्देश नलावडे व विभूती सावंत अशी तरुण कलाकार मंडळी प्रमुख भूमिका साकारत आहे.
या नाटकाबद्दल बोलताना, लेखक व दिग्दर्शक दीपेश सावंत यांनी सांगितले की आजकाल नात्यात संवाद अभावानेच आढळतो. मित्र असो वा पती-पत्नी प्रत्येक जण नात्यात एकमेकांना गृहीत धरून चालत असतात.ठराविक वेळी संवाद न साधला गेल्याने नात्यात अनेकदा गैरसमज निर्माण होतात जर तुम्ही योग्य वेळी संवाद साधला तसेच एकमेकांपासून कोणती गोष्ट लपवून ठेवली नाही,आपसात विश्वासाचे नाते निर्माण केले तसेच आपले मत शांतपणे मांडले तर निर्माण झालेले गैरसमज नक्कीच दूर होतात हा विचार यात मनोरंजन व विनोदी पध्दतीने मांडला आहे
या नाटकात नवरा-बायकोतील नात्यात संवादाच्या अभावामुळे जे समज- गैरसमज निर्माण होतात ते सोडविण्यासाठी त्यांचा वकील मित्र काय प्रयत्न करतो, हे अत्यंत खेळकर पध्दतीने मांडण्यात आले आहे. नाटकात दोन गीते असून गीतकार व संगीतकार संकेत शेटगे यांनी ती संगीतबद्ध केली आहे.
आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवा कलाकार प्रसाद रावराणे, विभूती सावंत व सिध्देश नलावडे यांची अभिनयाची केमिस्ट्री प्रेक्षकांना निश्चित आवडेल यात शंका नाही
या नाटकात वकिलाची भूमिका प्रसाद रावराणे करीत असून आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, यातील आदित्य व संध्या हे पती-पत्नी आहेत.त्या दोघांचा विवेक हा अत्यंत जवळचा मित्र आहे त्यांच्यात काही कारणामुळे निर्माण झालेला विसंवाद संवाद दूर करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आमचे हे नाटक तिघांचे असले तरी त्यात घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना आपल्या अवतीभवती घडत असल्याचा अनुभव नक्कीच येईल. नाटकाचा विषय गंभीर वाटत असला तरी हे नाटक गंभीर नसून हलकंफुलकं नाटक आहे.
“यदा कदाचित रिटर्न्स,” “ सौजन्याची ऐशी तैशी “,या नाटकात भूमिका केलेले विभूती सावंत यात संध्या ही व्यक्तिरेखा साकारत आहे आपल्या भूमिकेबद्दल ती म्हणाली संध्या ही व्यक्तिरेखा मस्तीखोर,खोडकर असून तिला मालिका- सिनेमा यात विशेष रस आहे .ती मजा मस्ती आनंद यात रमणारी आहे.
सिध्देश नलावडे यात आदित्य पटवर्धन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आदित्य हा विनोदी लेखक असून नवरा-बायकोमध्ये घडणाऱ्या गमतीजमती या नाटकात प्रेक्षकांना पहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.
नाटकास रॉबिन लोपेज व राम सगरे यांचे नेपथ्य व शिवाजी शिंदे यांची प्रकाश योजना लाभली असून उदयराज तांगडी प्रमुख निर्माते आहेत
– भास्कर कोर्लेकर