इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान
NHI कल्याण दि.13 मार्च :
स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्यामूळे समाजातील प्रत्येक स्त्री ही अलौकीकाच असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. निमित्त होते ते इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित कर्तुत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याचे. तत्पूर्वी अलौकीकाच्या माध्यमातून सादर झालेल्या इतिहासकालीन स्त्रियांच्या नृत्य – नाट्य अविष्काराने उपस्थितांची मनं जिंकली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात अतिशय सुंदर अशा सोहळ्याचे आयोजन केले होते. एकीकडे इतिहासकालीन स्त्रियांचा जीवनपट उलगडणारे मीना सोनवणे यांचे अलौकिका नाट्य तर दुसरीकडे कर्तुत्ववान स्त्रियांचा सन्मान असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी हे यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाभारत काळातील संमोहित राधाचे भक्तीप्रेम, रामायणातील कैकयीची फार कमी लोकांना माहीत असणारी दुसरी बाजू आणि भगवान गौतम बुद्ध काळातील महाप्रजापती गौतमी यांचा भारतीय महिलांना बौद्ध धर्मात प्रवेश मिळवून देण्याचा लढा मीना सोनवणे यांनी आपल्या अप्रतिम अभिनयातून सादर करत या तिन्ही स्त्रियांचे फारसे कोणाला माहीत नसणारे अंतरंग उलगडून दाखवले. ज्यावर उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.
तर कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या वैशाली प्रमोद जोशी, जयश्री सुधीर भावे, वर्षा म्हेतर, सोनाली पांचाळ, डॉ. सोनाली पितळे- सिंग या कर्तुत्ववान महिलांसह जान्हवी संजय जाधव या तरुणीचा डॉ. विजय सुर्यवंशी आणि डॉ. आरती सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी डॉ. आरती सुर्यवंशी यांनी महिलांच्या आयुष्यावर आधारित सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, केडीएमसी सचिव संजय जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अशोक प्रधान सर, के.सी.गांधी शाळेचे विश्वस्त मनोहर पालन, रोटरी क्लबचे मदन शंकलेशा आदी मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ ईशा पानसरे, सचिव डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ हिमांशु ठक्कर यांच्यासह डॉ. प्रदीप सांगळे, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. स्वाती शेलार, डॉ. सोनाली पाटील, डॉ. सोनाली पितळे सिंग यांच्यासह सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.