सध्या ‘फुलराणी’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनचाच एक भाग म्हणून मीडिया मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकार युवतींसाठी एका खास फॅशन शोचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. माध्यमकर्मी युवतींच्या उत्तम प्रतिसादात हा फॅशन शो चांगलाच रंगला. ‘फुलराणी’ या चित्रपटात सुबोध भावे यांनी ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका साकारली आहे.‘वीआरजी’ या ग्रुमिंग कंपनीचे मालक आहेत. या ग्रुमिंग कंपनीच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मार्गदर्शन करण्याचे काम सुबोध भावे म्हणजेच विक्रम राजाध्यक्ष करीत असतात. चित्रपटातील हा प्लॉट लक्षात घेऊन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फॅशन शोची एक अनोखी कल्पना मांडली होती.
सहभागी सर्व माध्यमकर्मी युवतींचे कौतुक करताना अभिनेता सुबोध भावे म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक फुलराणी दडलेली असते. आपल्या आत दडलेल्या त्या फुलराणीला आत्मविश्वासाने समोर आणता यायला हवं ‘फुलराणी’ चित्रपटातूनही शेवंता तांडेलचा ‘फुलराणी’ होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर ती आत्मविश्वासाने कशी मात करते? हे पहायला मिळणार आहे. ‘फुलराणी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आयोजित केलेला हा फॅशन शो पत्रकार युवतींमधील त्यांना ही माहित नसलेल्या त्यांच्यातील गुणांना समोर आणण्याचा प्रयत्न असल्याचं ही त्यांनी याप्रसंगी सांगितलं.
‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एसएंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेताबापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्चला ‘फुलराणी’ मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे.