एलिस पेरीने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. तसंच रिचा घोषनेही आक्रमक खेळी करत बंगळुरुच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.
RCB-W vs DC-W Match Update : महिला प्रीमियर लीगमध्ये पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची लढत दिल्ली कॅपिल्सच्या विरोधात होत आहे. आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर या लीगचा ११ वा सामना खेळवला जात आहे. या लीगमध्ये तीन सामन्यांत विजय मिळवल्याने गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बंगळुरु संघाची सुरुवात खराब झाली. कारण कर्णधार स्मृती मंधानाला या सामन्यातही धावांचा सूर गवसला नाही. दिल्लीच्या शिखा पांडेच्या गोलंदाजीवर मंधाना ८ धावांवर असताना झेलबाद झाली.
पण त्यानंतर एलिस पेरीने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. तसंच रिचा घोषनेही आक्रमक खेळी करत बंगळुरुच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पंरतु, १६ चेंडूत ३८ धावांची खेळी करत रिचा शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. पेरीने ५२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. त्यामुळे २० षटकांत बंगळुरुला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीला विजयासाठी १५१ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
दिल्लीची वेगवान शिखा पांडेने भेदक मारा करून बंगळुरुच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधाना पॉवर प्ले सुरु असतानाच तंबूत परतली. १५ चेंडूत ८ धावांची खेळी करत मंधाना शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर सोफी डिवाईनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सोफीलाही बाद करण्यात शिखा यशस्वी झाली. सोफीन १९ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर तारा नॉरीसच्या गोलंदाजीनं हेदर नाईटला जखडून टाकलं. हेदरने १२ चेंडूत ११ धावा केल्या. हेदरने स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेल्या चेंडूवर शिखा पांडेने अप्रतिम झेल घेतला.
हवेत उडी मारून जबरदस्त झेल घेत हेदरला तंबूत पाठवण्यात आलं. शिखाने पांडेने ४ षटकात २३ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. वुमन्स प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात विजय मिळवत आला नाही. तर दिल्लीने चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवून ६ गुण मिळवले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीला दिलेलं धावांचं आव्हान रोखण्यात बंगळुरुचा संघ यशस्वी होईल का? हे पाहावं लागणार आहे.