MUMBAI \ NHI- आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कस्तुरबा हॉस्पिटलने धडक दिली. सलामीवीर अंकुश जाधवच्या धडाकेबाज ७ चौकारांसह ७१ धावांच्या फलंदाजीसह गोलंदाजीत महत्वाचे दोन बळी घेतल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने सायन हॉस्पिटलचा ४४ धावांनी पराभव केला. कप्तान निलेश चव्हाण, संदीप चौधरी, संतोष खटाटे, डॉ.विपिन महाजन आदींनी सायन हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. अष्टपैलू अंकुश जाधव व संदीप चौधरी यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन भारतीय कामगार सेनेचे सेक्रेटरी राजन लाड, क्रिकेटप्रेमी विलास डांगे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर कस्तुरबा हॉस्पिटलने सायन हॉस्पिटल विरुद्ध प्रथम फलंदाजी करतांना दमदार प्रारंभ केला. सलामीवीर अंकुश जाधव (५८ चेंडूत ७१ धावा), महेश सनगर (१७ चेंडूत २३ धावा), दीपक नाखवा (१७ चेंडूत १९ धावा), कल्पेश भोसले (१६ चेंडूत १६ धावा) यांच्या आक्रमक खेळामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद १५१ धावा फटकाविल्या. सुभाष कदम, डॉ. विपिन महाजन, निलेश चव्हाण, अमोल कुंजीर यांनी विकेट घेणारी गोलंदाजी केली. प्रत्युत्तर देतांना सलामीवीर संतोष खटाटे (२७ चेंडूत ३४ धावा) व संदीप चौधरी (३३ चेंडूत ४४ धावा) यांनी १ बाद ५३ धावा अशी आश्वासक सुरुवात करून दिली. परंतु भरवंशाचा फलंदाज अष्टपैलू डॉ. विपिन महाजनची विकेट धावबादद्वारे लवकर मिळाल्यामुळे सायन हॉस्पिटलची घसरगुंडी होऊन १६.१ षटकात १०७ धावसंख्येवर त्यांचा डाव संपुष्टात आला. अंकुश जाधव (२१ धावांत २ बळी) व कल्पेश भोसले (२९ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. परिणामी कस्तुरबा हॉस्पिटलने ४४ धावांनी शानदार विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.