MUMBAI/NHI
माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सानपाडा स्कॉर्पियन्सने अखेरच्या सातव्या साखळी सामन्यात पहिला विजय नोंदवून शेवट गोड केला. सानपाडा स्कॉर्पियन्सने शुभम पुण्यार्थीने फटकाविलेल्या ७३ धावांमुळे अंबरनाथ अवेन्जर्सचा ५ गडी राखून पराभव केला. अंबरनाथ संघाला दमदार प्रारंभानंतर मोठी धावसंख्या रचता न आल्यामुळे पराभवास सामोरे जावे लागले. धडाकेबाज फलंदाज शुभम पुण्यार्थीला सामनावीर पुरस्काराने ठाण्याचे माजी नगरसेवक विलास सामंत यांनी गौरविले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर प्रथम फलंदाजी करतांना सलामीवीर कलश राय (३० चेंडूत ३९ धावा), जय बिस्ता (२१ चेंडूत २२ धावा), केविन अल्मेडा (२७ चेंडूत २५ धावा) यांनी अंबरनाथ अवेन्जर्सला बाराव्या षटकाला २ बाद ९८ धावा असा छान प्रारंभ करून दिला. परंतु त्यानंतर सानपाडा संघाच्या पराग पाटील (२४ धावांत ३ बळी) व अथर्व डाकवे (१९ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी करून अंबरनाथ संघाला मर्यादित २० षटकात ७ बाद १४६ धावसंख्येवर रोखले. सलामीवीर वरुण लवांडे (११ चेंडूत २२ धावा) व शुभम पुण्यार्थी (५५ चेंडूत ७३ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीसह ६८ धावांच्या सलामी भागीदारीमुळे सानपाडा संघाने विजयी लक्ष्य १९.१ षटकात ५ बाद १४९ धावांनी साकारले.