NHI/MUMBAI :
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप. बँकेने अजिंक्यपद पटकाविले. श्रमिक जिमखाना येथील अंतिम फेरीत रत्नागिरी बँकेने डीएमके जावळी सहकारी बँकेचा ३० गुणांनी मोठा पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार जावळी बँकेच्या ऋषिकेश चोरटेने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार रत्नागिरी बँकेच्या अभिजित घाणेकरने पटकाविला.
अंतिम लढतीमध्ये अभिजित घाणेकरच्या अष्टपैलू खेळामुळे रत्नागिरी डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप. बँकेने डीएमके जावळी सहकारी बँकेचा ३६-६ अशा गुणांनी मोठा पराभव केला. पहिल्या डावात दोन लोण देत रत्नागिरी बँकेने मध्यंतराला २७-४ असा विजयी पाया रचला होता. तत्पूर्वी उपांत्य फेरीत रत्नागिरी बँकेने महानगर बँकेवर ४०-११ असा तर जावळी बँकेने मुंबै बँकेवर ४०-२२ असा विजय मिळविला होता. युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, प्रवीण शिंदे, भार्गव धारगळकर, प्रकाश वाघमारे, हासम धामसकर, मनोहर दरेकर, नितीन गव्हादे, समीर तुळसकर, अमोल प्रभू आणि इतर पदाधिकारी यांनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविले. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्ये व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.