NHI
मुंबई : शिवाजी पार्क जिमखानातर्फे टेनिसपटू व संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा १८ व १९ मार्च रोजी दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आली आहे. ‘सेक्युरिटी एचक्यू’ या ग्लोबल सायबर सेक्युरिटी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीतर्फे ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे. दुहेरी गटात खेळविली जाणारी स्पर्धा टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी मर्यादित आहे. टेनिसमधील मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक हे महत्वाचे दोन घटक स्पर्धेपासून वंचित होत असल्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याने यंदा सातव्यांदा स्पर्धेचे सातत्य कायम राखले आहे. दुहेरीचे स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्यामुळे दादा खानोलकर यांच्या टेनिस कारकिर्दीला शोभेल, अशा दर्जेदार आयोजनात स्पर्धा पार पाडली जाणार आहे.
एमएसएलटीए मान्यतेने टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी होणाऱ्या दुहेरी टेनिस स्पर्धेत महिला जोडी, पुरुष जोडी अथवा मिक्स जोडी भाग घेऊ शकेल. स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रु.८०,०००/- रक्कमेचे पुरस्कार आहेत. अंतिम विजेत्यास रोख रुपये वीस हजार व दादा खानोलकर स्मृती चषक तर अंतिम उपविजेत्यास रोख रुपये पंधरा हजार व दादा खानोलकर स्मृती चषक दिला जाणार आहे. टेनिस रसिकांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देतांना विशेषतः युवा वर्गाने टेनिस मार्कर अथवा सहाय्यक प्रशिक्षकाच्या सेवेस करिअर म्हणून पाहावे, हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित खेळाडूंनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संजय पटेल (९८२०२ ४१३५१) अथवा शिवाजी पार्क जिमखाना कार्यालय (०२२ २४४४३७९९), दादर-पश्चिम, मुंबई-४०० ०२८ यांच्याकडे १४ मार्चपर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ५ वा. दरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन एसपीजीचे जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर यांनी केले आहे.