प्रतिनिधी
मुंबई/NHI
निराशाजनक प्रारंभानंतर दादोजी कोंडदेव स्टेडीयमच्या खेळपट्टीवर उतरलेल्या निखील पाटीलच्या उत्तुंग १३ षटकारांसह नाबाद शतकी फटकेबाजीमुळे वाशी वॉरीयर्सने सानपाडा स्कॉर्पियन्सचा ६० धावांनी पराभव केला आणि माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सहाव्या साखळी सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली. स्पर्धेतील सानपाडाचे आव्हान संपुष्टात आले असले तरी शेवटच्या लीग सामन्यात पहिला विजय नोंदविण्याची इर्षा बाळगून आहे. शतकवीर निखील पाटीलला सामनावीर पुरस्काराने एनएमपीएलचे कमिशनर प्रदीप कासलीवाल यांनी गौरविले. यावेळी एनएमपीएलचे एमडी अभिजित घोष, विनोद भानुशाली, विरेन जेटवा, भूपेंद्र सिन्हा, प्रवीण घेवरी आदी उपस्थित होते.
सानपाडा स्कॉर्पियन्सने नाणेफेक जिंकून वाशी वॉरीयर्स फलंदाजी दिली. वाशीच्या २ बाद २० धावांच्या अवस्थेनंतर फलंदाजीस उतरलेल्या निखील पाटीलने (४६ चेंडूत नाबाद १०९ धावा, १३ षटकार व २ चौकार) षटकारांच्या आतषबाजीने शतक ठोकत धावांचा वर्षाव केला. त्यामुळे वाशीने मर्यादित २० षटकात ५ बाद १९९ धावा झळकाविल्या. प्रत्युत्तर देतांना विजयी लक्ष्याच्या दडपणाखाली सानपाडाची फलंदाजी बहरली नाही. मध्यमगती गोलंदाज अतुल सिंग (२४ धावांत ३ बळी) व हार्दिक कुरंगले (२१ धावांत ३ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करीत सानपाडा संघाला २० षटकात ८ बाद १३९ धावसंख्येवर थोपविले. परिणामी वाशी संघाने ६० धावांनी तिसरा विजय नोंदविला. आकाश सावला (४८ चेंडूत ४६ धावा) व अंकुर सिंग (१७ चेंडूत ३० धावा) यांनी छान फलंदाजी केली.