प्रतिनिधी
मुंबई/NHI
अंकित साळसकरच्या अष्टपैलू खेळास सलामीवीर मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी यांनी उत्तम साथ दिल्यामुळे लीलावती हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचा १८ धावांनी पराभव केला आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रहेजा हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी अष्टपैलू नितेश म्हस्के, कप्तान अविनाश डांगळे, अष्टपैलू सचिंद्र ठाकूर आदींनी केलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार अष्टपैलू अंकित साळसकर व नितेश म्हस्के यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
शिवाजी पार्क मैदानात रहेजा हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून लीलावती हॉस्पिटलने दमदार फलंदाजी केली. सलामीवीर मनोहर पाटेकर (१७ चेंडूत २७ धावा), धर्मेश स्वामी (३६ चेंडूत ४१ धावा), अंकित साळसकर (१४ चेंडूत नाबाद २४ धावा), वीरेश दांडेकर (२५ चेंडूत २२ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५२ धावा फटकाविल्या. नितेश म्हस्के (२३ धावांत २ बळी) व संदीप पाटील (२३ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. सलामीवीर अविनाश डांगळे (१६ चेंडूत २१ धावा), अष्टपैलू नितेश म्हस्के (२९ चेंडूत २६ धावा), सचिंद्र ठाकूर (१३ चेंडूत १६ धावा), चेतन सुर्वे (१२ चेंडूत १५ धावा) यांनी रहेजा हॉस्पिटलच्या विजयासाठी केलेले प्रयत्न लीलावती हॉस्पिटलच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट घेत हाणून पाडले. अंकित साळसकर (१८ धावांत ३ बळी) व प्रवीण पांचाळ (३३ धावांत २ बळी) यांनी महत्वाचे विकेट घेतले. परिणामी रहेजा हॉस्पिटलचा डाव २० षटकात ९ बाद १३४ धावसंख्येवर संपुष्टात आला आणि लीलावती हॉस्पिटलने १८ धावांनी शानदार विजय मिळविला.