MUMBAI : NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा सलामी सामना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने जिंकला. सलामीवीर रोहन महाडिक, शंतनू मोरे यांची दमदार फलंदाजी व फिरकी गोलंदाज प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक यांची प्रभावी गोलंदाजी, यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने नवी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाचा ४१ धावांनी पराभव करून दुसरी फेरी गाठली. शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर झालेल्या उद्घाटनीय लढतीमधील उत्कृष्ट खेळाडू रोहन महाडिक व जयेश तांबे यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, एमबी युनियनचे सेक्रेटरी धर्मेश नाडकर्णी, क्रिकेटप्रेमी मनोज होलमुखे, सुनील बोरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी गौरविले.
केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर रोहन महाडिक (२९ चेंडूत ३८ धावा) व शंतनू मोरे (२५ चेंडूत ३५ धावा) यांनी प्रत्येकी ५ चौकार ठोकत दमदार फलंदाजी केली. त्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित षटकात ८ बाद १६६ धावा फटकाविल्या. मध्यमगती गोलंदाज अब्दुल अन्सारी (२७ धावांत ४ बळी) व मिल्टन लोबो (२१ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केली. प्रत्युतर देतांना सलामीवीर मिल्टन लोबो (११ चेंडूत २० धावा), सागर पाटील (१० चेंडूत २५ धावा), संदेश चव्हाण (३२ चेंडूत २६ धावा), जयेश तांबे (२४ चेंडूत ३४ धावा) यांनी ३ बाद ११४ धावा अशी आक्रमक सुरुवात करून देऊनही केडीए हॉस्पिटलचा डाव १८.५ षटकात १२५ धावसंख्येवर गडगडला.
त्याचे श्रेय कप्तान प्रदीप क्षीरसागर ( ११ धावांत ४ बळी) व रोहन महाडिक (१८ धावांत ३ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीला ध्यावे लागेल. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने ४१ धावांनी विजय मिळवून पहिली फेरी जिंकली. कामगार विभागातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर हे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त यंदाही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.